अखेर स्वाध्यायचा नवा अध्याय आठवडाभरातच थांबवावा लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 05:00 AM2021-05-24T05:00:00+5:302021-05-24T05:00:07+5:30
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. मुलांना शाळेत न येता कसे शिकविता येईल, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने व्हाॅट्सॲपद्वारे ‘स्वाध्याय’ उपक्रम हाती घेतला होता. यात दर आठवड्याला व्हाॅट्सॲपवर अभ्यासक्रम पाठविला जात होता. असे २४ आठवडे झाल्यावर शैक्षणिक सत्र संपल्यामुळे उपक्रमही बंद करण्यात आला. मात्र, परीक्षा न घेताच मुलांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय शासनाने घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शाळाच बंद असतानाही विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी ‘स्वाध्याय’ उपक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र, उन्हाळी सुटीच्या काळात मुलांना अभ्यासात का गुंतवता, अशी ओरड झाल्यानंतर व ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर अखेर स्वाध्यायचा नवा अध्याय थांबविण्यात आला. हा उपक्रम आता पुढचे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर सुरू करता येईल, अशी सावध भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. मुलांना शाळेत न येता कसे शिकविता येईल, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने व्हाॅट्सॲपद्वारे ‘स्वाध्याय’ उपक्रम हाती घेतला होता. यात दर आठवड्याला व्हाॅट्सॲपवर अभ्यासक्रम पाठविला जात होता. असे २४ आठवडे झाल्यावर शैक्षणिक सत्र संपल्यामुळे उपक्रमही बंद करण्यात आला. मात्र, परीक्षा न घेताच मुलांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे पुढच्या वर्षी मुलांना पुढच्या वर्गाचा अभ्यासक्रम शिकविण्यापूर्वी त्यांचा मागच्या वर्गाचा अध्ययनस्तर किती आहे, हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यात आला होता. १५ मे पासून स्वाध्यायचे स्वरूप बदलून त्यात पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात आले. त्यात मागील वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित १५-२० प्रश्नांची लिंक पाठविणे सुरू करण्यात आले होते. मात्र, आता उन्हाळी सुटी सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी लाभला. शिवाय, कोरोनाच्या अन्य जबाबदाऱ्यांमध्ये गुरफटलेल्या शिक्षकांनीही या उपक्रमाला विरोध केला. याबाबत ‘लोकमत’ने १८ मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत आता हा उपक्रम थांबविण्यात आला आहे.
या उपक्रमात दर शनिवारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला लिंक पाठविली जात होती. नंतर ही लिंक बीईओंच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली जात होती. मात्र, २१ मे रोजी या उपक्रमाचा २५ वा आठवडा संपल्यानंतर २२ मे रोजी २६ व्या आठवड्याची लिंकच पाठविण्यात आली नाही. त्याऐवजी उपक्रम थांबविल्याचा संदेश पाठविण्यात आला. शाळांना सुट्या असल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी असून पुढील सत्र सुरू झाल्यावरच स्वाध्याय उपक्रम सुरू करता येईल, असे या संदेशात परिषदेने स्पष्ट केले आहे.
एक लाखाने घटला होता प्रतिसाद
- गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील ५३ हजार ५२९ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय उपक्रमासाठी नोंदणी केली होती. तर, ५२ हजार ३२१ विद्यार्थ्यांनी स्वाध्यायची प्रश्नावली सोडवून पूर्ण केली होती. यात झरी ३७१, कळंब २५३८, महागाव ५७२०, मारेगाव १४७३, नेर ८५५९, पांढरकवडा २४४०, आर्णी ५३९३, बाभूळगाव २०५०, दारव्हा ३१०१, दिग्रस २६४८, घाटंजी ८९२, पुसद ४४००, राळेगाव २१४७, उमरखेड ३९९५, वणी १५९८, तर यवतमाळ पंचायत समितीमधील ६२०४ विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रत्यक्षात यापूर्वीच्या २४ व्या आठवड्यापर्यंत स्वाध्याय उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांची संख्या दीड लाखावर होती.
सध्या विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने २६ व्या आठवड्यासाठी स्वाध्यायची लिंक पाठविण्यात आलेली नाही. याचाच अर्थ सध्या स्वाध्याय थांबला आहे. नवे सत्र सुरू झाल्यावर स्वाध्याय पुन्हा सुरू होईल.
- डाॅ. रमेश राऊत, प्राचार्य,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यवतमाळ