अखेर जंगल तुडवित अधिकारी पोहोचले पारधी बेड्यावर; गाव सोडणाऱ्यांच्या व्यथा ऐकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 08:46 PM2022-03-29T20:46:44+5:302022-03-29T20:47:15+5:30

Yawatmal News अत्याचाराला कंटाळून ६० कुटुंबांनी गाव सोडल्याची चौकशी करण्यासाठी मंगळवारी अधिकारी जंगल तुडवत पारधीबेड्यावर पोहचले व त्यांनी व्यथा जाणून घेतल्या.

Finally, the officer reached Pardhi area; Heard the sorrows of those who left the village | अखेर जंगल तुडवित अधिकारी पोहोचले पारधी बेड्यावर; गाव सोडणाऱ्यांच्या व्यथा ऐकल्या

अखेर जंगल तुडवित अधिकारी पोहोचले पारधी बेड्यावर; गाव सोडणाऱ्यांच्या व्यथा ऐकल्या

Next

यवतमाळ : गावगुंडांच्याअत्याचाराला कंटाळून पारधी बांधवांच्या ६० कुटुंबीयांना गाव सोडून जंगलात आश्रय घ्यावा लागल्याचे वृत्त ‘लोकमत’ने उजेडात आणताच प्रशासन खडबडून जागे झाले. महिनाभरापासून दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी अखेर मंगळवारी दोन किलोमीटर जंगल तुडवित पारधी बेड्यावर पोहोचून अन्यायग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या.

महागाव तालुक्यातील माळवाकद येथील पारधी बांधव गावातील काही विघातक प्रवृत्तीच्या अन्यायाचे बळी ठरत आहेत. त्यामुळे हे नागरिक महिनाभरापूर्वी गाव सोडून पळाले. दोन किलोमीटर अंतरावर जंगलात एका तलावाच्या काठावर त्यांनी पाल ठोकून कसाबसा आश्रय घेतला; मात्र तेथेही उदरनिर्वाहासाठी त्यांना हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. ‘लोकमत’ने मंगळवारी याबाबतचे वृत्त प्रकाशित करून अन्यायग्रस्तांच्या व्यथा जगापुढे मांडल्या.

त्यामुळे सकाळीच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पथक माळवाकद येथे पोहोचले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी आगाशे, विजया पंधरे व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक पारधी बेड्यावरील महिलांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पाठविले. हे सर्व अधिकारी-कर्मचारी माळवाकद येथे पोहोचल्यानंतर गाव सोडून गेलेल्या पारधी बांधवांची राहुटी असलेल्या जंगलाकडे निघाले; मात्र तेथे पोहोचण्यासाठी साधा रस्ताही उपलब्ध नसल्याचे पाहून हे कर्मचारी काही जण दुचाकीने तर काही पायदळ राहुटीपर्यंत पोहोचले.

या दोन्ही विभागाच्या पथकांनी पारधी बांधव व तेथील महिलांची बयाणे नोंदवून घेतली. त्यांच्या गावकऱ्यांबाबतच्या नेमक्या तक्रारी काय आहेत, कोणत्या प्रकारचा अन्याय त्यांना सहन करावा लागला, याबाबत इन-कॅमेरा बयाणे घेण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष माळवाकद गावातील रहिवासी आणि सरपंचांच्याही भेटी घेण्यात आल्या. येथे काही मुले आई-वडिलांशिवाय असल्याचे निदर्शनास आले. त्यांना अनाथ प्रमाणपत्र देण्यासंदर्भात महागाव तहसीलदारांना सूचना करण्यात आली. यासंदर्भातील लेखी अहवाल सायंकाळी उशिरा यवतमाळात पोहोचल्यानंतर दिला जाणार असल्याचे या पथकांच्या प्रमुखांनी सांगितले. समस्या सोडविण्यासोबतच गावातील दोन्ही गटात समेट घडावा या दृष्टीने प्रयत्न करण्याची भूमिका प्रशासनाने घेतल्याचे दिसून आले.

पोलीस अधीक्षकांनी साधला संवाद

पारधी कुटुंबातील अन्यायग्रस्त महिलांना आपले म्हणणे मोकळेपणाने मांडता यावे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सुरुवातीला महिला पोलीस अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठविले; मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून मंगळवारी सायंकाळी स्वत: पोलीस अधीक्षकही माळवाकद येथे दाखल झाले. प्रत्यक्ष गावकरी आणि गाव सोडून गेलेले पारधी बांधव यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

Web Title: Finally, the officer reached Pardhi area; Heard the sorrows of those who left the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार