अखेर वणीत अतिक्रमण हटविण्यास मुहूर्त गवसला
By admin | Published: March 20, 2016 02:29 AM2016-03-20T02:29:24+5:302016-03-20T02:29:24+5:30
वणी शहर व शहराबाहेरील अतिक्रमण हटविण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला आहे.
अधिकाऱ्यांची बैठक : एप्रिलच्या पहिल्या, दुसऱ्या सप्ताहात सुरू होणार मोहीम
वणी : वणी शहर व शहराबाहेरील अतिक्रमण हटविण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. ‘लोकमत’ने नुकतेच १७ मार्चंच्या अंकात याबाबत ‘अतिक्रमण हटविण्यास मुहूर्त कधी मिळणार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
शहरात अतिक्रमणात सतत वाढ होत असताना ते हटविण्यासाठी नगरपरिषदेला मुहूर्त सापडत नव्हता. गेल्या मंगळवारी केवळ विकास कामांत अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात आले होते. त्यामुळे उर्वरित अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपरिषद कधी पुढाकार घेणार, असा प्रश्न ‘लोकमत’ने उपस्थित केला होता. त्या वृत्ताची दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले अन् एप्रिलच्या पहिल्या व दुसऱ्या सप्ताहात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असताना अतिक्रमणही सतत वाढतच आहे. परिसरातील कोळसा खाणींमुळे शहराचा विस्तार वाढत आहे. राहण्यासाठी, व्यवसायासाठी कोणी, कुठेही बांधकाम करताना दिसत आहे. या बांधकामासाठी नगरपरिषदेची परवानगी घेण्यासही कुणाला सवड नाही. खुलेआम काही जण शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधकाम करतात. तरीही नगरपरिषद कारवाईसाठी धजावत नाही, हेसुद्धा विशेष आहे.
शहरातील अनेक नागरिकांना राहायला घर नसताना काही व्यावसायीक व रहिवासी अतिक्रमण करून आपले बस्तान मांडत आहे. अनेक दुकानांसमोर अतिक्रमण दिसून येत आहे. मात्र ते हटविण्यासाठी कुणीच पुढाकार घेत नाही. या अतिक्रमणामुळे शहरातील रस्ते अरूंद होत आहे. वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. वाहनधारकांना वाहन ठेवण्यासही जागा उपलब्ध नसते. परिणामी दुकानांसमोर रस्त्यावरच आडी-तिडवी वाहने उभी ठेवली जातात. त्यातून वाहतुकीची समस्या निर्माण होते.
सध्या शहरात काही परिसरात भूमिगत नाल्या, रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांत अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यासाठी नगरपरिषदेने १५ मार्चला मोहीम राबविली होती. मात्र ही मोहीम केवळ तेवढ्यापुरतीच मर्यादित होती. त्यामुळे इतर अतिक्रमणधारक निर्धास्त झाले होते. तथापि ‘लोकमत’च्या वृत्तानंतर जागे झालेल्या प्रशासनाने आता सर्वच अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एप्रिल महिन्यातील पहिला आणि दुसऱ्या आठवड्याचा मुहूर्त त्यांनी काढला आहे. त्यामुळे आता उन्हाळ्यात अतिक्रमण हटण्याची शक््यता बळावली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
‘लोकमत’चे भाकीत ठरले खरे
अतिक्रमण हटविण्यासंदर्भात ‘लोकमत’ने १६ मार्चच्या अंकात लवकरच अधिकाऱ्यांची बैठक होण्याचे भाकीत वर्तविले होते. ते भाकीत तंतोतंत खरे ठरले. त्यानुसार बुधवारी १८ मार्चला उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या कक्षात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अतिक्रमण हटविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला अपार यांच्यासह तहसीलदार रणजित भोसले, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता किशोर येवले, महावितरणचे राऊत, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सायरे, दूरसंचारचे अभियंता गेडाम यांच्यासह नझूलचे अधिकारी उपस्थित होते.
अशी राहणार मोहिमेची दिशा
एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात प्रथम मारेगाव मार्ग व घुग्गुस मार्गावरील शहराबाहेरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सप्ताहात शहरातील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. त्यात नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील अतिक्रमणाचा समावेश असेल. अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी विद्यमान मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी धाडस दाखविल्याने शहर अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त होण्याची शक्यता बळावली आहे. मात्र त्यासाठी त्यांना सामान्य नागरिकांनी सहकार्य करण्याचीही खरी गरज आहे.