अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून चेतना अभियानास आर्थिक मदत
By admin | Published: January 18, 2016 02:34 AM2016-01-18T02:34:36+5:302016-01-18T02:34:36+5:30
शासन स्तरावरुन बळीराजा चेतना अभियानाला गती देण्यासाठी निधी तर उपलब्ध होतच आहे.
कृषी प्रदर्शन : स्वयंसेवी संस्थांकडून सामूहिक विवाह मेळावे, संस्थांनी पुढाकार घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
यवतमाळ : शासन स्तरावरुन बळीराजा चेतना अभियानाला गती देण्यासाठी निधी तर उपलब्ध होतच आहे. मात्र या बळीराजा चेतना अभियानाला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सामाजिक उत्तरदायित्त्व म्हणून आर्थिक स्वरुपात मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या विचारात घेता, त्यांना या गतेर्तून बाहेर काढण्यासाठी, शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, त्यांच्यात जगण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी बळीराजा चेतना अभियान युध्द पातळीवर राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या अध्यक्षतेत तर सदस्य सचिव म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख या समितीचे सदस्य म्हणून काम करीत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. यात किर्तनकार, प्रबोधनकार, पथनाटय पथक, कलापथके, आदींच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. साहित्य, रांगोळीकार, कविता, विचारवंतांच्या लेखांची माहिती पुस्तीका शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलींचे सामूहिक विवाह मेळावे, व्यसनमुक्तीपर कार्यक्रम, संकटावर मात कशी करावी याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे शिक्षण, आरोग्यावरील खर्च भागविण्यासाठी आर्थिक मदत करणे, त्रस्त कुटुंबांना शोधून त्यांना आर्थिक मदत करणे, शेतकऱ्यांशी संबंधित शिबिरे, रॅली अशा प्रकारचे आयोजन करुन शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे.
शासन स्तरावरुन निधीची उपलब्धता वेळोवेळी होणारच आहे. मात्र, संपूर्ण जिल्हाभर शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यासाठी मोठया प्रमाणात निधीची आवश्यकता पडणार आहे. त्यामुळे जिल्हयातील शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनीसुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून सहभाग असावा, यासाठी वर्ग १ मधील अधिकारी हजार रुपये, वर्ग दोन मधील अधिकारी पाचशे रुपये, वर्ग तीन मधील कर्मचारी तिनशे रुपये तर वर्ग ४ मधील कर्मचारी यांना शंभर रुपये अशी सहयोग राशी बळीराजा चेतना अभियान समिती या नावाने जिल्हाधिकारी कार्यालयातील शेतकरी विशेष कक्ष येथे देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
सामूहिक विवाह मेळावे
बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. सामाजिक संस्थांनी विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांच्या मुलींचे विवाह या सोहळ्यात लावून देण्यात येणार आहे. सदर मेळावे सर्वधर्मीय आहे. मेळाव्यात सहभागी होऊन लग्न करणाऱ्या लाभार्थ्यांस १५ हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार लाभार्थी जिल्ह्याचा रहिवासी असावा. मुलीच्या वडीलांकडे सातबारा असणे आवश्यक आहे. तसेच वडीलांचा रहिवासी पुरावा, लाभार्थ्याचे बँकेत खाते असावे.
सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणाऱ्या आयोजन खर्चात शासकीय अनुदानातून वधुला एक ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र व कपडे आदी साहित्य दिले जाणार आहे. विवाह सोहळा आयोजित करणारी संस्था ही नोंदणीकृत असावी. विवाहासाठी वर किंवा वधू नाबालिक नसावी. तसे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. सामूहिक सोहळ्यात लग्न करणाऱ्या जोडप्यास इतर शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी व परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, तहसिल चौक, यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)