पहिलीचे विद्यार्थी शोधताना प्रौढ निरक्षरही शोधा, नव्या वर्षाचा टास्क
By अविनाश साबापुरे | Published: May 12, 2024 04:11 PM2024-05-12T16:11:36+5:302024-05-12T16:12:07+5:30
देशात २०२२ पासून सुरू झालेले नवभारत साक्षरता अभियान महाराष्ट्रात २०२३-२४ या वर्षात सुरू झाले. पहिल्या वर्षी एकंदर १२ लाख ४० हजार निरक्षरांची नोंदणी करून परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट केंद्राकडून देण्यात आले होते.
यवतमाळ : प्रौढ असाक्षरांची पहिली परीक्षा आटोपून सव्वाचार लाख लोक साक्षर झाले. आता २०२४-२५ या नव्या वर्षासाठी राज्यभरातील शिक्षकांना निरक्षर नोंदणीचे नवे टार्गेट ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार ५ लाख ७३ हजार ३३७ प्रौढ निरक्षरांची नोंदणी करायची आहे. तसेच जुन्या वर्षातील उर्वरित निरक्षरांसह एकंदर ८ लाख ४ हजार ९९ प्रौढांची यंदा परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे आता मे महिन्यात गुरुजींनी पहिल्या वर्गाचे विद्यार्थी शोधत असतानाच प्रौढ निरक्षरांची नोंदणीही सुरू करण्याचे निर्देश योजना शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.
देशात २०२२ पासून सुरू झालेले नवभारत साक्षरता अभियान महाराष्ट्रात २०२३-२४ या वर्षात सुरू झाले. पहिल्या वर्षी एकंदर १२ लाख ४० हजार निरक्षरांची नोंदणी करून परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट केंद्राकडून देण्यात आले होते. परंतु, ६ लाख ४१ हजार ८१६ निरक्षरांचीच उल्लास ॲपवर नोंदणी होऊ शकली, तर ४ लाख ५९ हजार ५३३ जणांनी १७ मार्च रोजी परीक्षा दिली. त्यातून ४ लाख २५ हजार ९०६ प्रौढ साक्षर म्हणून उत्तीर्ण झाले.
हे अभियान २०२७ पर्यंत चालणार असून, दरवर्षी नोंदणी व परीक्षार्थींचे टार्गेट ठरवून देण्यात येत आहे. परंतु, महाराष्ट्रातील मागील वर्षाचा अनुभव पाहता २०२४-२५ या वर्षासाठी नवे टार्गेट न देता जुन्या १२ लाख ४० हजारांपैकी उर्वरित असाक्षरांचीच नोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार, यंदा ५ लाख ७३ हजार ३३७ असाक्षरांची नोंदणी करणे आवश्यक आहे, तर मागील वर्षी परीक्षेला बसू न शकलेले, उत्तीर्ण होऊ न शकलेले असे असाक्षर मिळून एकंदर ८ लाख ४ हजार ९९ असाक्षरांची परीक्षा घेतली जाणार आहे. याबाबत शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी सर्व जिल्हानिहाय उद्दिष्ट देऊन नोंदणीचे निर्देश दिले आहेत.
प्रौढ साक्षरतेचा जिल्हानिहाय आढावा सुरू
नव भारत साक्षरता अभियानाची नवीन वर्षात प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी योजना शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी दि. ९ मेपासून जिल्हानिहाय आढावा सुरू केला. पहिल्या दिवशी अमरावती विभागातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा, अमरावती, वाशिम जिल्ह्यांचा आढावा व्हीसीद्वारे घेण्यात आला, तर १० मे रोजी नागपूर विभागाचा आढावा घेतला. आता १४ मे रोजी कोल्हापूर, १५ मे रोजी पुणे, १६ मे रोजी लातूर, १७ मे रोजी छत्रपती संभाजीनगर, २२ मे रोजी आणि २४ मे रोजी मुंबई विभागातील जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी, डायट प्राचार्यांसह अगदी तालुका व केंद्र स्तरावरच्या कर्मचाऱ्यांना सामील करून माहिती घेण्यात येत आहे.
नव्या वर्षात अशी असेल साक्षरता मोहीम
जिल्हा : असाक्षर नोंदवा : परीक्षेला बसवा
- विदर्भ :
अकोला : ५,८४५ : १३,२२३
अमरावती : ७,६८७ : १४,७५८
भंडारा : ६,१२३ : ७,०३०
बुलडाणा : ९,५८८ : १४,२११
चंद्रपूर : ८,३०९ : २३,५१५
गडचिरोली : १७४३ : ३१,७०७
गोंदिया : ६,५४७ : ७,८८९
नागपूर : १७,४८४ : २३,३२५
वर्धा : ८,८१५ : ९,४३९
वाशिम : ७,१६६ : १८,९७२
यवतमाळ : १२,४०३ : १७,१२२
- मराठवाडा :
छ. संभाजीनगर : २४,३१५ : २६,९२१
हिंगेाली : ६,९२७ : १०,४२८
जालना : १६,५७७ : २१,१६२
लातूर : १७,५६३ : १९,२७२
नांदेड : २४,५७३ : २८,६२९
धाराशिव : १३,३७५ : १५,२३७
परभणी : १३,९११ : २०,३७४
बीड : २०,४२५ : २१,२८१
- पश्चिम महाराष्ट्र :
कोल्हापूर : २३,७१० : २४,२९२
पुणे : ३८,३०८ : ४१,९४४
सांगली : १५,१५५ : १५,८९५
सातारा : १६,२५५ : १८,०५०
सोलापूर : २९,७९७ : ३५,२५०
अहमदनगर : २८,६३५ : ३४,६२४
- कोकण :
रायगड : १२,१०८ : १५,३२९
रत्नागिरी : ९,३३७ : १२,०९४
मुंबई शहर : ११,९११ : १५,१२७
मुंबई उपनगर : ३०,४६१ : ३५,६८४
सिंधुदुर्ग : ४,४१५ : ४,४९६
ठाणे : २१,६५७ : ३३,२३७
पालघर : २९,१२४ : ३३,६९१
- उत्तर महाराष्ट्र :
नंदूरबार : १४,६८१ : ३१,५०३
नाशिक : २९,७२४ : ४०,००७
धुळे : १६,८५६ : १७,५३२
जळगाव : १५,८२७ : ५०,८४९
महाराष्ट्र एकूण : ५,७७,३३७ : ८,०४,०९९