आश्रमशाळा शिक्षकांच्या घराची ‘महसूल’कडून झडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:06 PM2019-02-03T23:06:02+5:302019-02-03T23:06:37+5:30
शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक मुख्यालयी राहतात की नाही, याची झाडाझडती प्रकल्प अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, महसूलच्या कर्मचाºयांची टिम करून आश्रमशाळेत पाठविली जात असून ही टिम थेट शिक्षकांच्या घरात शिरून पाहणी करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक मुख्यालयी राहतात की नाही, याची झाडाझडती प्रकल्प अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, महसूलच्या कर्मचाºयांची टिम करून आश्रमशाळेत पाठविली जात असून ही टिम थेट शिक्षकांच्या घरात शिरून पाहणी करीत आहे. या प्रकाराने शिक्षकांमध्ये मात्र एकीकडे घबराट तर दुसरीकडे प्रकल्प अधिकाºयांबद्दल संताप पसरला आहे.
शासकीय आश्रमशाळा या निवासी स्वरुपाच्या असून या शाळांमध्ये कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांना शाळेच्या ठिकाणीच निवासी राहणे बंधनकारक आहे. मात्र पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत आश्रमशाळांचे अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची बाब प्रकल्प अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. २१ जानेवारीलाच त्यांनी सर्व मुख्याध्यापकांना आदेश देऊन कोणते कर्मचारी बाहेरगावाहून जाणे-येणे करतात, याची माहिती मागविली आहे.
आता त्याही पुढे जाऊन त्यांनी थेट शिक्षकांची घरझडतीच घेणे सुरू केले आहे. महसूल विभागाच्या कर्मचाºयांची टिम आश्रमशाळेच्या ठिकाणी पाठविली जात आहे. यात नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारीही समाविष्ट आहेत. शुक्रवारी मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत एक टिम धडकली. यात मारेगावचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठ्याचा समावेश होता.
क्वार्टर राहण्यालायक नाही
एकीकडे आश्रमशाळेच्या शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश आहेत. तर दुसरीकडे आश्रमशाळांचे क्वार्टर राहण्यायोग्यच नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. पांढरकवडा प्रकल्पातील सर्वच आश्रमशाळांमध्ये कर्मचारी निवासाची पुरेशी व्यवस्था नाही. बऱ्याच शाळेत पहिली ते सातवीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम झाले. परंतु या शाळांवर बारावीपर्यंत वर्ग वाढले आहेत. त्यातुलनेत केवळ वर्गखोल्यांचे शेड बनविण्यात आले. निवासस्थाने बांधण्यात आली नाही. जी काही निवासस्थाने आहेत, तीही नादुरुस्त आहेत. पाण्याचे नळ, शौचालय, सांडपाण्याची सोय नाही. त्यामुळे कर्मचारी बाहेरगावातून जाणे-येणे करतात, असा शिक्षकांचा दावा आहे.
अशी झाली उलटतपासणी
ही टिम आश्रमशाळेत धडकताच त्यांनी सर्व कर्मचाºयांना आपापल्या घरी जाण्यास बजावले. त्यानंतर नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी कर्मचाºयांच्या क्वार्टरमध्ये गेले. थेट आत शिरून प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. तुमची ‘फॅमिली’ कुठे आहे, हा पहिलाच प्रश्न शिक्षकांना टोचला. हे क्वार्टर तुमचेच कशावरून? तुमचे कपडे कुठे आहे? तुमचे सामान कुठे आहे? बाहेर वाळत असलेले कपडे तुमचेच कशावरून? अशा प्रश्नांच्या भडिमाराने शिक्षक हैराण झाले. काही कर्मचारी क्वार्टरमध्ये न राहता गावात भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्याही घरी महसूलच्या टिमने धडक दिली. प्रश्नांच्या भडिमारातच घराचे फोटो काढण्यात आले.