आगीत २५ क्विंटल ओवा पीक भस्मसात
By admin | Published: May 7, 2017 12:53 AM2017-05-07T00:53:01+5:302017-05-07T00:53:01+5:30
परंपरागत पिकांना फाटा देत आपल्या शेतात पिकविलेला २५ क्विंटल ओवा शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाला.
अडीच लाखांचे नुकसान : दिग्रसच्या लायगव्हाणची घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : परंपरागत पिकांना फाटा देत आपल्या शेतात पिकविलेला २५ क्विंटल ओवा शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाला. यात दोन लाखांच्या ओव्यासह थ्रेशर मशीनही जळून खाक झाली. ही घटना तालुक्यातील लायगव्हाण येथे शनिवारी दुपारी ३ वाजता घडली.
दिग्रस तालुक्यातील मांडवा येथील शेतकरी गजानन राघोजी क्षीरसागर यांनी यंदा आपल्या शेतात ओव्याचे पीक घेतले. पिकाची पूर्ण वाढ झाल्यानंतर कापलेल्या ओव्याच्या झाडाचे मोठे दोन ढीग लावले. ओवा काढण्यासाठी थ्रेशर मशीनही आणण्यात आले. सकाळी काही प्रमाणात ओवा काढण्यात आला. त्यानंतर गजानन क्षीरसागर भोजनासाठी दुपारी २ वाजता घरी गेले. त्यावेळी शेतातून जाणाऱ्या वीज तारांमध्ये शॉर्टसर्किट होवून त्याच्या ठिणग्या ओव्याच्या गंजीवर पडल्या. काही क्षणातच संपूर्ण ओवा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. सुमारे २५ क्विंटल ओवा या आगीत जळाल्याची माहिती आहे. सोबतच ओवा काढणीस आणलेले थ्रेशर, ताडपत्री, ठिबक नळ्या जळून खाक झाल्या. विशेष म्हणजे, दिग्रस कृषी विभागांतर्गत आत्मा मॉडेलनुसार या शेतात मसाले पीक प्रात्यक्षिक घेण्यात येत होते.