वणीत आगीचे तांडव, हॉटेल जळून खाक, सिलिंडरचाही स्फोट : लाखो रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:23 IST2025-03-27T17:22:13+5:302025-03-27T17:23:39+5:30

कोणतीही जिवीत हानी झाली नाही : मोठी दुर्घटना टळली

Fire breaks out in Vani, hotel burnt down, cylinder explodes: Loss worth lakhs of rupees | वणीत आगीचे तांडव, हॉटेल जळून खाक, सिलिंडरचाही स्फोट : लाखो रुपयांचे नुकसान

Fire breaks out in Vani, hotel burnt down, cylinder explodes: Loss worth lakhs of rupees

संतोष कुंडकर
वणी (यवतमाळ) :
बुधवारी मध्यरात्रीनंतर वणीतील साईमंदिर चौकात आगीने अक्षरश: तांडव घातले. या चौकातील एका व्यावसायिक संकुलाच्या वरच्या माळ्यावर असलेल्या एका हॉटेलला आतून आग लागली. या आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले. आगीदरम्यान हॉटेलमधील सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटाने परिसर हादरून गेला. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग इतकी भीषण होती की, या आगीत हॉटेलमधील संपूर्ण साहित्याची राखरांगोळी झाली. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमाने दोन तासानंतर ही आग आटोक्यात आली. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

वणी-यवतमाळ मार्गावरील साईमंदिरासमोर एक मोठे व्यावसायिक कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्पलेक्सच्या तळमजल्यावर एक खासगी बॅंक, तर वरच्या माळ्यावर न्यू रसोई नामक हाॅटेल आहे. वणीतील प्रशांत उदापूरकर व उमेश पिंपळकर हे या हॉटेलचे संचालक आहेत. या कॉम्प्लेक्सला लागूनच अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. लागूनच स्टेट बॅंकदेखील आहे. बुधवारी २६ मार्च रोजी रात्री १० वाजता नेहमीप्रमाणे हॉटेल बंद झाले. हॉटेलमधील सर्व कर्मचारी आपापल्या घरी निघून गेले होते. मध्यरात्रीनंतर १.१५ वाजताच्या सुमारास हॉटलमधून अचानक धुराचे लाेट निघू लागले. रात्रीची वेळ असल्याने हा परिसर सामसूम होता. मात्र या मार्गावर मध्यरात्री पोलिसांची पेट्रोलिंग सुरू होती. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना हॉटेलमधून धूर निघताना दिसला. त्यांनी लगेच याबाबत माहिती वणी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच, अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र तोवर हॉटेलमधून आगीचे मोठे लोळ बाहेर पडू लागले हाेते. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. या आगीत हॉटेलमधील चार फ्रिज, खुर्च्या, टेबल, तंदूर फॅन, ओव्हन, कुलर व सजावटीचे साहित्य जळून खाक झाले.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शंका
या भीषण आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या आगीत नेमके किती नुकसान झाले, हे अद्याप कळू शकले नाही. मात्र ७० लाखांचे नुकसान झाल्याचे या हॉटेलचे संचालक प्रशांत उदापूरकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

मोठी दुर्घटना टळली
या इमारतीला लागून अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. ही आग अधिक पसरली असती, तर खूप मोठी दुर्घटना घडली असती. आगीची माहिती मिळताच बँकेचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर त्यांच्या पथकासह घटनास्थळी उपस्थित होते. फायर ऑफिसर नंदू बेलसरे यांच्या मार्गदर्शनात फायर फायटर दीपक वाघमारे, आशुतोष जगताप, प्रीतेश गौतम, शुभम टेकाम व वाहनचालक देविदास जाधव यांनी आग आटोक्यात आणली.

Web Title: Fire breaks out in Vani, hotel burnt down, cylinder explodes: Loss worth lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.