वणी येथील नगरपालिकेच्या शाळेला लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 09:46 PM2020-11-07T21:46:13+5:302020-11-07T21:47:00+5:30
एसपीएम शाळेच्या मागे नगरपरिषद शाळा क्रमांक तीन आहे. या शाळेला शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान अचानकपणे आग लागली
वणी (यवतमाळ) : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक तीनला शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
एसपीएम शाळेच्या मागे नगरपरिषद शाळा क्रमांक तीन आहे. या शाळेला शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान अचानकपणे आग लागली. या शाळेतून आगीचे लोळ त्या परिसरातील रवी कांबळे यांना दिसताच त्यांनी लगेच याबाबत वणी पोलीस स्टेशन व पालिकेला माहिती दिली. त्यानंतर लगेच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. यावेळी या दलाने आगीवर नियंत्रण मिळिवले. या आगीत पोषण आहाराचे धान्य, महत्वपूर्ण कागदपत्रे व तीन खोलीमधील साहित्य जळून खाक झाले. या आगीत जवळपास तीन लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज मुख्याध्यापिका उमा राजगडकर यांनी वर्तविला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. घटनास्थळावर वणी पोलीस व पालिकेचे कर्मचारी दाखल झाले होते. तसेच आगीचे लोळ दिसताच परिसरातील शेकडो नागरिकांनी या शाळेकडे धाव घेतली.