दारव्हा तहसील कार्यालयाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:13 PM2019-06-14T22:13:10+5:302019-06-14T22:13:47+5:30
येथील तहसील कार्यालयात गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन संगणक संच, प्रिंटर यासह संपूर्ण वायरिंग व काही महत्त्वाचे दस्तावेज खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : येथील तहसील कार्यालयात गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन संगणक संच, प्रिंटर यासह संपूर्ण वायरिंग व काही महत्त्वाचे दस्तावेज खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते.
प्रथम तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागात आग लागली. नंतर वायरिंगमुळे बाहेरील बाजूस आग पसरली. आग इतकी भीषण होती की पाहता-पाहता संपूर्ण तहसील कार्यालय धुराने वेढले गेले. तहसील कार्यालयातून धूर निघत असल्याचे काही पोलीस कर्मचाऱ्यांना दिसले. त्यांनी तहसीलदारांना माहिती दिली. तहसीलदार अरुण शेलार व इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लगेच तहसीलमध्ये पोहोचून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दल आल्यावर आगीवर नियंत्रण मिळविले.
इंग्रजकालीन इमारतीत जीर्ण वायरिंग
वेळीच सर्वांनी धावपळ केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा कार्यालयातील सर्व महत्त्वाचे दस्तावेज, जुने रेकॉर्ड, संगणक संच व इतर साहित्य जळून खाक झाले असते. इंग्रजकालीन असलेल्या या कार्यालयातील इलेक्ट्रिक वायरिंग खूप जुनी झाली. यापूर्वीही आग लागून वायरिंग जळाली होती. यावेळीसुद्धा वायरींमधील शॉर्टसर्किटमुळेच आग लागली. त्यामुळे तहसीलमधील संपूर्ण वायरिंग दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे.