दारव्हा तहसील कार्यालयाला आग; संगणकासह महत्त्वाचे दस्तावेज खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 04:24 PM2019-06-14T16:24:09+5:302019-06-14T16:25:20+5:30

प्रथम तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागात आग लागली.

Fire at Darwah Tehsil office; Important documents with computers | दारव्हा तहसील कार्यालयाला आग; संगणकासह महत्त्वाचे दस्तावेज खाक

दारव्हा तहसील कार्यालयाला आग; संगणकासह महत्त्वाचे दस्तावेज खाक

Next

दारव्हा : येथील तहसील कार्यालयात गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन संगणक संच, प्रिंटर यासह संपूर्ण वायरींग व काही महत्त्वाचे दस्तावेज खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहिती मिळताच तहसीलचे अधिकारी, कर्मचारी, नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.

प्रथम तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागात आग लागली. नंतर वायरिंगमुळे बाहेरील बाजूस आग पसरली. आग इतकी भीषण होती की पाहता-पाहता संपूर्ण तहसील कार्यालय धुराने वेढले गेले. त्याचवेळी तहसील कार्यालयातून धूर निघत असल्याचे काही पोलीस कर्मचा-यांना दिसले. त्यांनी लगेच कार्यालयात धाव घेतली. तेव्हा आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तहसीलदारांना माहिती दिली. तहसीलदार अरुण शेलार व इतर अधिकारी, कर्मचा-यांनी लगेच तहसीलमध्ये पोहोचून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.

अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. या आगीत आवक-जावक विभागातील दोन संगणक संच, प्रिंटर, पंखा, काही दस्तावेज व कार्यालयातील संपूर्ण वायरिंग जळून खाक झाली. तसेच माहिती पत्रके, पोस्टर, सागवान लाकूड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

मोठा अनर्थ टळला
तहसीलला आग लागल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तहसीलदारांना माहिती दिली. नंतर अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझविली. वेळीच सर्वांनी धावपळ केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा कार्यालयातील सर्व महत्त्वाचे दस्तावेज, जुने रेकॉर्ड, संगणक संच व इतर साहित्य जळून खाक झाले असते. इंग्रजकालीन असलेल्या या कार्यालयातील इलेक्ट्रिक वायरिंग खूप जुनी झाली. यापूर्वीही आग लागून वायरिंग जळाली होती. यावेळीसुद्धा वायरींमधील शॉर्ट सर्किटमुळेच आग लागली. त्यामुळे तहसीलमधील संपूर्ण वायरिंग दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Fire at Darwah Tehsil office; Important documents with computers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.