आगीत सहा घरांसह गोठा भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 09:49 PM2018-05-23T21:49:36+5:302018-05-23T21:49:36+5:30
रोहित्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सहा घरांसह गोठा जळून भस्मसात झाल्याची घटना तालुक्यातील कोनदरी (वाकान) येथे बुधवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुसद, उमरखेड आणि दिग्रस येथून अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : रोहित्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सहा घरांसह गोठा जळून भस्मसात झाल्याची घटना तालुक्यातील कोनदरी (वाकान) येथे बुधवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुसद, उमरखेड आणि दिग्रस येथून अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
कोनदरी येथे असलेल्या रोहित्रामध्ये सकाळी शॉर्टसर्किट झाले. त्यातून उडालेल्या ठिणग्या घरावर पडल्या. त्यामुळे घराने पेट घेतला. त्यातच सकाळी वारा वेगाने वाहत असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केले. गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. परंतु गावात पाणीटंचाई असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते. पक्क्या विटा व टीनपत्र्याच्या घरातून आगीच्या ज्वाळा निघत होत्या. दरम्यान पुसद, उमरखेड आणि दिग्रस येथील अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळातच पुसदचा बंब पोहोचला. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
आगीत सुधाकर धनसिंग राठोड, मनीष चंद्रभान राठोड, दिलीप चंद्रभान राठोड, अनिल चंद्रभान राठोड, सुनील चंद्रभान राठोड, संदीप चंद्रभान राठोड यांची घरे भस्मसात झाली. तसेच एक गोठा जळून खाक झाला. घरातील सर्व साहित्य बेचिराख झाले. यात दीडशे टीनपत्रेही जळाले. तसेच गोठ्यातील ४० पीव्हीसी पाईप, कडबा, कुटार व शेतीपयोगी साहित्य असे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी तहसीलदार नामदेव इसाळकर, नायब तहसीलदार गजानन कदम, नितीन भुतडा यांनी भेट दिली. आमदार राजेंद्र नजरधने यांनी सानुग्रह मदत देण्याच्या सूचना दिल्या.
रोहित्र हटविण्याची केली होती मागणी
कोनदरी येथील अगदी गावात एक सिंगल फेज आणि दुसरे थ्री फेज असे दोन रोहित्र अगदी जवळ आहे. या रोहित्रातून नेहमी आगीच्या ठिणग्या उडत होत्या. याबाबत संबंधितांनी वीज वितरणला वारंवार कळविले. परंतु दखल घेतली नाही. परिणामी बुधवारी सहा घरांची राखरांगोळी होऊन कुटुंब उघड्यावर आले.