पुसद येथे अग्निशस्त्र विकणाऱ्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 05:00 AM2021-07-26T05:00:00+5:302021-07-26T05:00:11+5:30
इम्तियाजला काही वर्षापूर्वी दराटी पोलिसांनी काडतुसासह अटक केली होती. यावेळी त्याचा अवैध शस्त्रविक्रीचा भंडाफोड झाला होता. त्यानंतरही इम्तियाजविरोधात वसंतनगर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी ३०७ चा गुन्हाही त्याच्यावर असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावरून इम्तियाजचा खून हा त्याच्या अवैध शस्त्रविक्रीच्या व्यवसायातूनच झाल्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहरासह परिसरात चोरट्या मार्गाने अग्निशस्त्रांची विक्री करणाऱ्या युवकाची गोळ्या झाडून रविवारी दुपारी हत्या करण्यात आली. या थरारक घटनेने पुसद शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हे हत्याकांड शस्त्र विक्री व्यवहारातील वादातून झाले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे. इम्तियाज खान सरदार खान (२८, रा. वसंतनगर, पुसद) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी ओंकार पवार (१९, रा. हिवरी, ता. महागाव) याला ताब्यात घेतले आहे. वाशिम रोडवरील एका हाॅटेलजवळ त्याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी गोळीबार केला. इम्तियाजवर सहा राऊंड फायर केले. त्यापैकी एक गोळी त्याच्या डोक्यात व दोन गोळ्या छातीवर लागल्याने जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ओंकार पवार याने सै. अस्लम सै. सलीम (२०, रा. काळी दौ, ता. महागाव) हा देखिल मारेकरी असल्याचे सांगितले. आरोपी ओंकार हा चालक असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुसद शहर पोलिसांनी आरोपी ओंकार याला हिवरी येथून अटक केली. ही कामगिरी पुसद शहर एपीआय रत्नपारखी, ढोमणे, एएसआय ससाने, भाऊ ताठे, मोहम्मद जलील यांनी केली.
या घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन, शहर ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी भेट दिली.
इम्तियाज हा कारमधील एसी दुरुस्तीचे काम करीत होता. तो विवाहित असून त्याला पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा आप्त परिवार आहे.
काडतुसासह केली होती अटक
- इम्तियाजला काही वर्षापूर्वी दराटी पोलिसांनी काडतुसासह अटक केली होती. यावेळी त्याचा अवैध शस्त्रविक्रीचा भंडाफोड झाला होता. त्यानंतरही इम्तियाजविरोधात वसंतनगर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी ३०७ चा गुन्हाही त्याच्यावर असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावरून इम्तियाजचा खून हा त्याच्या अवैध शस्त्रविक्रीच्या व्यवसायातूनच झाल्याची शक्यता आहे.
कारागृहातून सुपारी दिल्याचा संशय
- गोळीबार हत्याकांडातील मुख्य सूत्रधार हा मोक्काअंतर्गत कारागृहात आहे. तेथूनच सुपारी देवून इम्तियाजचा गेम झाला असावा असा संशय वर्तविला जात आहे. शस्त्रविक्रीतील व्यवहारातून दोन गट पडले. यातून हा वाद पेटला. यातूनच ही हत्या घडवून आणल्याचे सांगितले जाते.