भयंकर! शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यावर भररस्त्यात झाडल्या गोळ्या, आरोपी पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 05:47 PM2022-01-11T17:47:31+5:302022-01-11T18:41:09+5:30
उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले बालरोग तज्ज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे हे पुसद रोड वरील गोरखनाथ हॉटेल समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञात युवकाने त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडल्या.
यवतमाळ : उमरखेड येथील वैद्यकीय अधिकाऱ्यावर अज्ञाताने भर रस्त्यावर गोळ्या (Firing)) झाडल्याची घटना उघडकीस आली आहे. डाॅ. हनुमंत धर्मकारे हे या गोळीबारात गंभीर जखमी झाले असून आरोपी पसार झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उमरखेड-पुसद मार्गावर साकळे विद्यालयापुढे घडली.
डॉ. हनुमंत धर्मकारे (वय ४५) हे मागील ७ वर्षांपासून उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय उमरखेड बसस्थानकाच्या समोर त्यांचे खासगी बाल रुग्णालय आहे. गेल्या ७ वर्षाच्या काळात त्यांची कारकीर्द सर्वसमावेशक राहिलेली आहे. या शिवाय कुठल्याही वादाच्या विषयात त्यांचे नाव चर्चेत आले नाही. दरम्यान, आज अचानक त्यांच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबार केल्यामुळे शहरात चर्चेला पेव फुटले आहे.
शहरातील उत्तरवार रुग्णालयाच्या नजीकच असलेल्या गोरखनाथ हॉटेल येथे चहा पाण्यासाठी त्यांची बैठक असते. सायंकाळी ५ वाजताच सुमारास मोटर सायकलने स्वत:च्या खासगी दवाखानाकडे जात असताना अज्ञात युवकाने त्यांच्यावर बंदूक रोखून तीन ते चार गोळ्या झाडल्या. त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी युवकाला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो दुचाकीने पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला धर्मकारे यांना नागरिकांनी उचलून येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर धर्मकारे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. दरम्यान, ही घटना शहरात वार्यासारखी पसरली असून नागरिकांनी शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली. विशेष म्हणजे आज माजी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील हे उमरखेडच्या दौऱ्यावर होते. त्यांनीही घटनास्थळी भेट दिली त्यांच्यासोबत आमदार नामदेव ससाने, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा होते. उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, उमरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.