पहिल्याच आखाडीला सासर गेले, माहेर गेले अन् तीही गेली !
By admin | Published: April 28, 2017 02:26 AM2017-04-28T02:26:21+5:302017-04-28T02:26:21+5:30
लग्नानंतरची पहिली आखाडी आली म्हणून तिचा भाऊ तिला घ्यायला आला. माहेराच्या ओढीने ती भावासोबत निघाली,
उष्माघात : मोहदाच्या नवविवाहितेचा गवंडी येथे मृत्यू
यवतमाळ : लग्नानंतरची पहिली आखाडी आली म्हणून तिचा भाऊ तिला घ्यायला आला. माहेराच्या ओढीने ती भावासोबत निघाली, पण जीवघेण्या तापमानाने खरोखरच तिचा जीव घेतला. बाभूळगाव तालुक्यातील गवंडी येथील बसस्टॉपवर तिला भोवळ आली अन् जागीच मृत्यू झाला.
रंजना गणेश पाचखेडे (२०) असे या मृत नवविवाहितेचे नाव आहे. पांढरकवडा तालुक्यातील मोहदा हे तिचे माहेर. आईवडिलांनी लाडात वाढविलेल्या रंजनाचे अवघ्या ९ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. १९ एप्रिल रोजी बाभूळगाव तालुक्यातील गवंडी येथील गणेश पाचखडेसोबत ती विवाहबद्ध झाली. मोहदा येथील शेतकरी सूर्यभान नानोटे यांनी अत्यंत आनंदात आपल्या लेकीचे हात पिवळे केले. पण अवघ्या आठवडाभरातच त्यांच्या आनंदावर काळाची वक्रदृष्टी पडली. शुक्रवारी आलेली अक्षयतृतिया म्हणजेच रंजनाची लग्नानंतरची पहिली आखाडी होती. आपल्या बहिणीला माहेरी आणायचे म्हणून भाऊ विजय नानोटे मोठ्या आनंदाने रंजनाच्या सासरी गवंडी येथे गेला होता. तेथून बहिण भाऊ मोहद्याला यायला निघाले. मात्र गवंडी बसथांब्यावर आॅटोरिक्षातून उतरताच रंजनाला अचानक चक्कर आली. भर उन्हात ती खाली पडली. तिला तातडीने बाभूळगावच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथून यवतमाळच्या जिल्हा रूग्णालयात अतिदक्षता कक्षात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रंजनाचा मृत्यू झाला. उष्माघातामुळे रंजनाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज मेडिकलमधील डॉक्टरांनी व्यक्त केला. दहावीपर्यंत शिकलेल्या रंजनाचे वडील आणि पतीही शेतकरी आहेत. रंजनाच्या हातावरची मेहंदी वाळण्यापूर्वीच तिचा मृत्यू पाहण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली असून संपूर्ण मोहदा गाव शोकमग्न झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)