राज्यातील पहिले बिरसा पर्व यवतमाळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:09 PM2017-11-08T23:09:11+5:302017-11-08T23:09:24+5:30
येत्या १५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांची १४२ वी जयंती साजरी होणार आहे. यानिमित्त यवतमाळात ११ आणि १२ नोव्हेंबरला राज्यातील पहिल्या बिरसा पर्वाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येत्या १५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांची १४२ वी जयंती साजरी होणार आहे. यानिमित्त यवतमाळात ११ आणि १२ नोव्हेंबरला राज्यातील पहिल्या बिरसा पर्वाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
राज्यातील सर्व आदिवासी बांधवांना एकत्रित करण्यासाठी येथे बिरसा पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वामध्ये सर्व समाज एकत्र येणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील २५ आमदारांना निमंत्रित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून बोगस आदिवासींवर कारवाई करावी, हा बिरसा पर्वाचा मुख्य उद्देश असल्याचेही बिरसा पर्व समितीच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने बोगस आदिवासींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र राज्य शासनाने पावले उचलली नाही. राज्यात एक लाख ९५ हजार ५६० बोगस आदिवासी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पावले उचलावी. याकरिता लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, याविषयावर बिरसा पर्वात चर्चा होणार आहे. या कार्यक्रमाच्या चारही सत्रांचे उद्घाटन राज्य विधीमंडळाच्या आदिवासी जनजाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार अशोक उईके करणार आहेत. या पर्वाला राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे उपाध्यक्ष खासदार अनुसया उईके, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार राजू तोडसाम, माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके, प्रमुख प्रवक्ते अॅड. सुमित्रा वसावा आदी उपस्थित राहणार आहे.
पत्रकार परिषदेला बिरसा पर्व समितीचे अध्यक्ष राजू चांदेकर, सचिव किशोर उईके, कार्याध्यक्ष गुलाब कुडमेथे, उपाध्यक्ष शैलेश गाडेकर, कोषाध्यक्ष बंडू मसराम, संघटक राजू केराम, अरूण पारधी, दीपक करचाल, श्रीकांत कनाके, नीलेश आत्राम आदी उपस्थित होते.