वागद येथे पहिल्यांदाच पोहोचली एसटी बस
By admin | Published: July 4, 2015 02:43 AM2015-07-04T02:43:56+5:302015-07-04T02:43:56+5:30
अडाण नदीच्या काठावर असलेल्या वागद येथे आजपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नव्हता. भौतिक सोयीसुविधांपासून हे गाव कोसो दूर होते.
महागावकसबा : अडाण नदीच्या काठावर असलेल्या वागद येथे आजपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नव्हता. भौतिक सोयीसुविधांपासून हे गाव कोसो दूर होते. आजही गावाच्या वेशीपर्यंत पायदळच जावे लागत होते. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी वागद ते महागाव अशी पायपीट करावी लागत होते. बरेच वर्षानंतर ग्रामस्थांचे भाग्य फळाला आले. बसफेरी सुरू झाल्याचा आनंद ग्रामस्थांमधून ओसंडून वाहत होता. बुधवारी १ जुलैला गावात एसटी बस आल्याचे पाहून चक्क अनेकांनी बसची पूजा केली. चालक व वाहकाला ग्रामस्थांनी शेला, नारळ देऊन स्वागत केले. मिठाई वाटून हा आनंद साजरा करण्यात आला.
वागद या गावाला अडाण नदीचा वेढा असल्याने गावात येण्यासाठी मार्गच नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांची आजतागायत पायपीट सुरू होती. शेवटी वागद ते महागाव हा रस्ता तयार करण्यात आला. मात्र या मार्गाने बसफेरीच सुरू नसल्याने येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना पायपीट करत जावे लागत. ही गंभीर बाब अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना सलत होती. आधुनिक तंत्रज्ञानाने जग जवळ येत असतानाच वागद येथे साधी बसफेरीही नव्हती. गावातून बसफेरी सुरू व्हावी यासाठी ग्रामस्थांनी दारव्हा आगार विभाग नियंत्रकाकडे अर्ज दिला. विभाग नियंत्रकांनी यावर सकारात्मक निर्णय घेऊन बसफेरी सुरू केली. १ जुलैला वागद येथे बस येणार म्हणून गावातील महिलांनी जय्यत यारी केली होती. रस्त्यांवर रांगोळ््या काढून स्वागत करण्यात आले. अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत होता.
त्यांनी एसटी महामंडळाची बस गावात आल्यानंतर सरपंच वसुंधरा ज्ञानेश्वर ठाकरे, उपसरपंच नंदू फुुलसिंग चव्हाण, ज्ञानेश्वर ठाकरे, तुळशीराम जाधव, शाळा समितीचे सदस्य यांनी एकत्र येऊन बस गाडीचे स्वागत केले. हा सोहळा आजच्या आधुनिक युगात सर्वांसाठी धक्का देणारा आहे. (वार्ताहर)