एकादशीला तयारी अन् द्वादशीला वारी; कुठे बैलबंडीवर वरात, तर कुठे डीजे लावून चिमुकल्यांची मिरवणूक

By अविनाश साबापुरे | Published: June 30, 2023 05:41 PM2023-06-30T17:41:32+5:302023-06-30T17:44:01+5:30

शाळा भरली : शाळेच्या पहिला दिवसाला अत्यंत उत्साहात सुरुवात

First Day of School : district schools were filled with the crowd of boys and the enthusiasm of the teachers | एकादशीला तयारी अन् द्वादशीला वारी; कुठे बैलबंडीवर वरात, तर कुठे डीजे लावून चिमुकल्यांची मिरवणूक

एकादशीला तयारी अन् द्वादशीला वारी; कुठे बैलबंडीवर वरात, तर कुठे डीजे लावून चिमुकल्यांची मिरवणूक

googlenewsNext

यवतमाळ : तब्बल दोन महिन्यांची उन्हाळी सुटी संपवून शुक्रवारी जिल्ह्यातील शाळा पोरांच्या गर्दीने, शिक्षकांच्या उत्साहाने भरल्या. गुरुवारी आषाढी एकादशी असतानाही शिक्षकांनी शाळांच्या सजावटीची तयारी केली अन् शुक्रवारी द्वादशीला वाजतगाजत चिमुकल्या विद्यार्थ्यांची वारी शाळेत दाखल झाली. अनेक गावांमध्ये अक्षरश: बैलबंडी सजवून त्यात विद्यार्थ्यांना आणले गेले. तर काही उत्साही शिक्षकांनी चक्क डीजे लावून नाचत नाचत विद्यार्थी शाळेपर्यंत आणले. 
शाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात सुरू झाल्याचे जिल्हाभरातील चित्र होते.

गेल्या २० एप्रिलपासून शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या होत्या. आता २०२३-२४ या नव्या शैक्षणिक सत्राला ३० जूनपासून प्रारंभ झाला. त्यानिमित्त सर्व शाळांमध्ये ‘प्रवेशोत्सवा’चा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ. जयश्री राऊत यांच्या नियोजनानुसार अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी दिल्या. पहिल्या दिवशी नाचगाणे, गप्पा गोष्टी अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबाबत आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रप्रमुख मधुकर काठोळे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांची बैलबंडीवर मिरवणूक काढण्यात आली. यवतमाळ शहरातील अँग्लो हिंदी शाळेत स्वत: शिक्षणाधिकारी डाॅ. जयश्री राऊत आणि शिक्षण उपनिरीक्षक योगेश डाफ यांनी प्रवेशात्सवात सहभाग घेतला. या अधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचा संच देण्यात आला. कळंब तालुक्यातील सुकळी गावात डीजे लावून, विद्यार्थ्यांना ब्लेझर घालून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मुख्याध्यापक अमोल पाटेकर, शिक्षक संदीप कोल्हे यांच्या उत्साहातून ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. 

आईबाबा बी संगतीला हाय...ताई दादा बी संगतीला हाय...
गुरुजी बी संगतीला हाय.. अन् बाई बी संगतीला हाय...
सोनू तुझ्या शिक्षणाची रे... आता तयारी करायची हाय..!

हे गोण डीजेवर वाजत असताना विद्यार्थ्यांनीही ताल धरला होता. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप दरणे, उपाध्यक्ष शशिकांत जाधव, ग्रामपंचायत सदस्या आनंद मांढरे, अर्चना थूल यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाने पहिला दिवस साजरा करण्यात आला. अंबिकानगरातील नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक सहामध्ये मुख्याध्यापिका करुणा खैरे, मनोहरपंत भिसे, प्रतीभा शेळके, रेखा वरखडे, संजय चुनारकर, शाळा व्यस्वस्थापन समिती अध्यक्ष विभा कामठे आदींच्या हस्ते नवगताचे स्वागत करून पाठ्यपुस्तक, दप्तर वाटप करण्यात आले. हाच उत्साह बोरगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही पाहायला मिळाला. येथे गणवेश, पुस्तक, पेन, वही देऊन विद्यार्थ्यांसह छायाचित्रण करण्यात आले. तसेच मनपूरच्या जिल्हा परिषद शाळेत जिल्हाधिकारी अमोल येडगे, सीईओ श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्या उपस्थितीत डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन करण्यात आले. 

जिल्हाधिकारी, सीईओंनी वाटप केले पुस्तक

शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी अमोल येडगे, सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी मडकोना आणि मनपूर येथील शाळांना भेटी दिल्या. अधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, गणवेश व पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वत:चा परिचय करून दिला, घरातील व्यक्तींची नावे सांगितली. उन्हाळी सुट्टीत केलेल्या सहशालेय कृती, गावाबद्दल माहिती याबाबत चर्चा केली. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी राजू मडावी, सहाय्यक बीडीओ किशोर गोळे, बीईओ विद्या वैद्य, विस्तार अधिकारी शिल्पा पोटपल्लीवार, केंद्रप्रमुख शहाजी घुले, केंद्रप्रमुख थोटे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष उषा गोटे, मुख्याध्यापक हिरामण भुरे, शिक्षक रवींद्र तामगाडगे, सीमा मंगाम, ललिता मरसकोले, दीपक चौधरी, देवानंद सोयाम व वंदना शिरभाते उपस्थित होते.

Web Title: First Day of School : district schools were filled with the crowd of boys and the enthusiasm of the teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.