जिल्ह्यात होणार देशी ‘बिटी’चा पहिला प्रयोग
By admin | Published: August 19, 2016 01:12 AM2016-08-19T01:12:58+5:302016-08-19T01:12:58+5:30
बिटी वानाचे पेटंट पूर्णत: विदेशी कंपन्यांकडे आहे. यामुळे बिटी वानाचा पुरवठा विदेशी कंपन्याच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे.
एक हजार हेक्टरात लागवड : आवळगावात २०० हेक्टरमध्ये सामूहिक शेती
यवतमाळ : बिटी वानाचे पेटंट पूर्णत: विदेशी कंपन्यांकडे आहे. यामुळे बिटी वानाचा पुरवठा विदेशी कंपन्याच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. यामुळे दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे देशी चलन विदेशात जाते. विदेशी कंपन्या मालामाल झाल्या आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी देशी बिटी वान विकसित करण्यात भारतीय कृषी शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. हे देशी वान विकसित करण्याचे पहिले पाऊल जिल्ह्यात उचलण्यात आले आहे. जिल्ह्यात एक हजार हेक्टरवर याची लागवड करण्यात आली. अवळगावात २०० हेक्टरचा संयुक्त प्रयोग हाती घेण्यात आला आहे. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबण्यास पूर्णत: मदत होणार आहे.
जिल्ह्यात दरवर्षी २२ लाख बिटी पॅकेट्स आयात करण्यात येतात. ही उलाढाल ८० ते १२० कोटींच्या घरात आहे. राज्यातील ही उलाढाल १२०० कोटींच्या घरात आहे. बोंड अळीवर मात करणारे तंत्रज्ञान विकसित करून विदेशी तंत्रज्ञानाने बिटी वान आणले. यामुळे देशी वान नष्ट झाले. याचा फायदा आता विदेशी कंपन्या घेत आहे. भरमसाट दर आकारून कोट्यवधी रूपयांची लूट केली जात आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशी वानाच्या काही जाती विकसित केल्या आहेत. यामध्ये एके ०८४ वानाचा जिल्ह्यात प्रयोग हाती घेण्यात आला आहे. हे देशी बिटी वान एक वेळा विकसित केल्यानंतर शेतकऱ्यांना तीन वर्ष बियाणे खरेदी करण्याची गरज राहणार नाही. यातून शेतकऱ्यांचे पैसे वाचतील. सोबतच शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन देशी वानातून मिळेल. हे वान रसशोषक किडीसह बोंडअळीवर मात करणार आहे. यामुळे फवारणीचा खर्चही वाचणार असल्याने हे वान फायद्याचे ठरणार आहे. (शहर वार्ताहर)