पहिल्या लोकसभेचे साक्षीदार पुखराजजी बोथरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:12 PM2019-03-17T22:12:45+5:302019-03-17T22:13:21+5:30
पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून सतत सर्व लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणारे १०२ वर्षांचे ज्येष्ठ मतदार पुखराजजी उमीचंदजी बोथरा, हे १७ व्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी सज्ज आहे.
अशोक पिंपरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून सतत सर्व लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणारे १०२ वर्षांचे ज्येष्ठ मतदार पुखराजजी उमीचंदजी बोथरा, हे १७ व्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी सज्ज आहे.
१७ एप्रिल १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण त्यांना आजही आठवते. त्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती. राळेगाव मतदार संघाचा भाग मध्यप्रदेश प्रांताशी जोडला होता. वर्धा लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रथम मतदान केले, हे विशेष. २८ जानेवारी १९१७ रोजी जन्मलेले हे आजोबा आता १०२ वर्षांचे आहे.
स्वातंत्र्य संग्रामाची स्थिती त्यांनी डोळ्यांनी पाहिली. वर्धा येथे शिक्षण घेत असताना त्यांनी राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या सभा जवळून बघितल्या. सेवाग्राम आश्रमात जाऊन दूरुन महात्मा गांधी यांना बघायचे. विदेशी कपड्याची होळी शहरात होत असताना टोप्या, कपडे जळताना त्यांनी पाहिल्या.
विद्यार्थी असल्याने हे सर्व त्यांनी डोळ्यांनी बघितले. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांना जवळून पाहण्याचा क्षण सांगताना त्याचे तारुण्य जागृत झाले होते.
आता परिस्थिती बदलल्याची खंत
पहिल्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव कथन करताना जेव्हा राजकीय लोकांचा तेव्हाच्या परिस्थितीचा त्यांनी उल्लेख केला. आता परिस्थिती बदलली आहे. त्यावेळी राजकीय वातावरण हे देशभक्तीचे होते. सध्या त्यांच्या डोळ्यांना बरोबर दिसत नाही, ऐकायला येत नाही. तरीही बसून नातवंडासोबत रममान होत असतात. नेमके काय होत आहे, याची माहिती कुटुंबियांकडून ते जाणून घेतात. तरूण पिढीने लोकशाहीच्या या प्रक्रियेत मतदानाचा हक्क बजावावा, असे पुखराजजी बोथरा यांनी आवर्जून सांगितले.