यवतमाळ पालिकेचा १२०० घरकुलांचा पहिला प्रकल्प
By Admin | Published: January 20, 2017 03:00 AM2017-01-20T03:00:20+5:302017-01-20T03:00:20+5:30
नगरपरिषद क्षेत्रात बेघरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल बांधण्याचा आराखडा तयार केला जात
बेघरांची होणार सोय : वाढीव क्षेत्रातील सात भूखंडांचा प्रस्ताव
सुरेंद्र राऊत यवतमाळ
नगरपरिषद क्षेत्रात बेघरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल बांधण्याचा आराखडा तयार केला जात असून नागपूर मार्गावरच्या तायडे नगरातील १० एकर जागेत १२०० घरकुलांचा पहिला प्रोजेक्ट साकारण्यात येणार आहे. तसेच वाढीव क्षेत्रातील सात शासकीय भूखंड मिळविण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल बांधकामासाठी निधीची मर्यादा नसल्याने पालिकेकडून तयार करण्यात आलेल्या घरकूल आराखड्यानुसार मागेल तितका निधी केंद्र सरकारकडून मिळणार आहे. यात ज्यांच्याकडे मालकीची जागा आहे व ज्यांकडे जागा नाही अशा दोन्ही लाभार्थ्यांची यादी तयार केली जात आहे. तीन लाख रूपये उत्पन्न मर्यादा आणि स्वत:चे घर नसल्याचा पुरावा अथवा भाडे कराराची प्रत देऊन या घरकुलाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी दवे असोसिएट्सकडून लाभार्थ्यांची नोंद घेण्याचे काम सुरू आहे. विहित नमुन्यातील अर्जावरून ही आॅनलाईन यादी तयार केली जात आहे. आतापर्यंत शहरातील विविध भागातून घरकुलासाठी ८ हजार ५०० अर्ज प्राप्त झाले आहेत. सध्याही अर्ज नोंदणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील घरकूल योजनेचा आराखडा तयार केला जात आहे. यासाठी नगरपरिषदेने नागपूर मार्गावर तायडेनगर परिसरातील १० एकर भुखंडावर १२०० घरकूल प्रस्तावित केले आहे. पालिका क्षेत्रात समाविष्ठ झालेल्या भागातही शासकीय भूखंड आहेत. त्या जागा मिळविण्यासाठी पालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. यात वडगाव येथे दोन भूखंड, पिंपळगावमध्ये तीन भूखंड, मोहा, लोहारा येथील प्रत्येक एक शासकीय भूखंड घरकूल योजनेसाठी मागण्यात येणार आहे. केंद्राकडून विकास आराखड्यानुसार निधी दिला जात असल्याने लाभार्थी निवड व घरकुलांची संख्या या दोन्हीसह प्रस्ताव शासनाकडे दिला जाणार आहे. घरकुलासाठी लाभार्थ्यांकडून नगरपरिषदेत मोठ्याप्रमाणात अर्ज नोंदणी केली जात आहे. तीन ते सहा लाख उत्पन्न असलेल्यांना गृह कर्जाच्या व्याजदारात सवलत दिली जाणार आहे. स्वत:च्या मालकी ३७० चौरस फुट क्षेत्र असणे बंधनकारक आहे. अशा लाभार्थ्यांना घरकूलसाठी अडीच लाखापर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे.