आधी श्रमदान, नंतरच सप्तपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:12 PM2018-04-21T22:12:39+5:302018-04-21T22:12:39+5:30
तालुक्यातील आंधबोरी आणि नांझा ही अतिशय छोटीशी गावे. डोंगरदऱ्या व जंगलाने वेढलेल्या या गावात पाणीटंचाई ही पाचवीलाच पुजलेली. पाणीटंचाईतून कायमची मुक्तता करण्यासाठी संपूर्ण गावाने चंग बांधला.
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : तालुक्यातील आंधबोरी आणि नांझा ही अतिशय छोटीशी गावे. डोंगरदऱ्या व जंगलाने वेढलेल्या या गावात पाणीटंचाई ही पाचवीलाच पुजलेली. पाणीटंचाईतून कायमची मुक्तता करण्यासाठी संपूर्ण गावाने चंग बांधला. यासाठी सामूहिक श्रमदान सुरूझाले. श्रमदानात नित्यनेमाने सहभागी होणाºया नव वर-वधूंनी लग्नाच्या दिवशीही श्रमदान करुन आपला विवाह साजरा केला.
नांझा येथील गुणवंत मारोती दाभेकर यांचा विवाह गावातीलच सुषमा रामचंद्र देवनळे हिच्याशी जुळला. तत्पूर्वी या दोन्ही युवक-युवतींनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले होते. लग्नाच्या दिवशीही त्यांनी श्रमदान करुनच आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याची शपथ घेतली.
आंधबोरी येथील भारती भोयर हिचा विवाह नांदुरा येथील प्रशांत पोटकुले याचेशी जुळला. गावाला पाणीदार करण्यासाठी अख्ख आंधबोरी मग्न आहे. भोयर कुटुंबही खारीचा वाटा उचलत आहे. सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण गाव एकदिलाने एकत्र आले आहे. सर्वजण मनापासून श्रमदानात गुंतले आहे. ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ हा जलसंधारणाचा मूलमंत्र घेऊन गावाने सकारात्मक आणि आशावादी वाटचाल सुरु केली आहे. गावातील आबालवृध्द मोठ्या उत्साहाने श्रमदानात आपला वाटा उचलत आहे. नवदाम्पत्यानेही या गावात श्रमदान केले.
लग्नाच्या दिवशीही श्रमदान करुन कुठलेही तत्वज्ञान न सांगता समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात श्रमदानाने व्हावी यासाठी या जोडप्यांनी आधी श्रमदान नंतर सप्तपदी केली. हा त्यांचा सर्व खटाटोप गावाला पाणीटंचाईतून मुक्त करण्यासाठी होता.