पहिल्यांदाच दहावीत जिल्ह्याची 99 टक्क्यांवर झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 05:00 AM2021-07-17T05:00:00+5:302021-07-17T05:00:17+5:30

जिल्ह्यातून यंदा ३८ हजार ६९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरला होता. पण परीक्षाच रद्द झाल्याने बोर्डाच्या सूचनेनुसार प्रत्येक शाळेने या सर्वच विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन करून विषयनिहाय गुणदान केले होते. ते सर्व गुण बोर्डाच्या पोर्टलवर भरल्यानंतर शुक्रवारी निकाल घोषित केला. त्यात ३७ हजार ९५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी १७ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी प्राप्त केली आहे.

For the first time, the 10th district jumped to 99 percent | पहिल्यांदाच दहावीत जिल्ह्याची 99 टक्क्यांवर झेप

पहिल्यांदाच दहावीत जिल्ह्याची 99 टक्क्यांवर झेप

Next
ठळक मुद्देविभागात यवतमाळ अव्वल : १७ हजार विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, बहुतांश शाळांचा निकाल १०० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला. त्यात जिल्ह्याने आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच ९९ टक्क्यांच्या पुढे झेप घेतली आहे, तर अमरावती विभागातून अव्वल स्थान पटकावले आहे. यंदा जिल्ह्याचा दहावीचा निकाल तब्बल ९९.७१ टक्के इतका घसघशीत लागला आहे. 
यंदा कोरोनाने दहावीच्या विद्यार्थ्यांवर वर्षभर अवकृपा केली होती. कोरोनामुळे शाळाच भरू शकली नाही, अखेर दहावीची परीक्षाही रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी प्रचंड तणावात आले होते. मात्र अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या निकालाने विद्यार्थ्यांना भरभरून गुण दिल्याचे स्पष्ट झाले.
जिल्ह्यातून यंदा ३८ हजार ६९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरला होता. पण परीक्षाच रद्द झाल्याने बोर्डाच्या सूचनेनुसार प्रत्येक शाळेने या सर्वच विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन करून विषयनिहाय गुणदान केले होते. ते सर्व गुण बोर्डाच्या पोर्टलवर भरल्यानंतर शुक्रवारी निकाल घोषित केला. त्यात ३७ हजार ९५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी १७ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी प्राप्त केली आहे. प्रावीण्य श्रेणी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची ही संख्या आजवरची सर्वाधिक संख्या ठरली आहे. तसेच १७ हजार १८९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर दोन हजार ८८ विद्यार्थी दि्वतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मात्र १२०५ विद्यार्थी जेमतेम काठावर पास झाले आहेत. 
दरम्यान, मागीलवर्षी जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९४.६३ टक्के लागला होता, तर १७६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. मात्र यंदा इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्याचा निकाल ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. तर ६३९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.

रेकाॅर्ड ब्रेक पैकीच्या पैकी !
दरवर्षी शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळा कौतुकास पात्र ठरतात. त्यांची संख्याही मोजकीच असते. मात्र यंदा जिल्ह्यातील एकूण ६४२ शाळांपैकी तब्बल ६३९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. पैकीच्या पैकी विद्यार्थी उत्तीर्ण करण्याचा हा विक्रम ठरला आहे. मागीलवर्षी केवळ १७६ शाळांचा निकाल शंभर टक्के होता, हे विशेष. यंदा गुंज (ता. महागाव) येथील मनोहर नाईक माध्यमिक विद्यालय, पुसद येथील श्री शिवाजी हायस्कूल आणि चिंचगाव (ता. नेर) येथील दि इंग्लिश हायस्कूल या तीन शाळांचा निकाल शंभर टक्के लागू शकलेला नाही. मात्र याही शाळांचा निकाल ९९ टक्क्यांच्या आसपास आहे, हे विशेष.

यश प्रचंड, तरीही स्वागत थंड

दहावीत जिल्ह्याला प्रचंड यश मिळाले. तरी यंदा या निकालाचे कुठेही स्वागत होताना दिसले नाही. कोरोनामुळे कोणत्याही शाळेत, सायबर कॅफेत निकाल पाहण्यासाठी ना गर्दी दिसली, ना कोणतेही पालक पेढे वाटताना दिसले.

‘फ्रेशर्स’चा निकाल ९९.९९ टक्के
यंदा परीक्षेला बसलेल्या नियमित विद्यार्थ्यांची संख्या ३६ हजार ६२१ होती. त्यापैकी ३६ हजार ६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर तीन विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. हे तीन विद्यार्थी नेर, पुसद आणि महागाव येथील शाळेचे आहेत. यंदा अंतर्गत मूल्यमापन असतानाही हे तिघे अनुत्तीर्ण कसे झाले, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

११० विद्यार्थी नापास
यंदा दहावीतील नियमित तीन विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. तर ‘रिपीटर’ विद्यार्थ्यांपैकी १०७ जण अनुत्तीर्ण झाले आहेत. कोरोनामुळे शाळांच्याच हाती गुणदान असतानाही हे विद्यार्थी अनुत्तीर्ण कसे झाले, याबाबत आता गंभीर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, ‘रिपीटर’ विद्यार्थ्यांचे गुणदान करताना अडचणी येत असल्याबाबत आधीच शिक्षकांमधून मोठ्या प्रमाणात ओरड झाली होती. दरम्यान, बोर्डाकडे विद्यार्थ्यांच्या गुणदानाची माहिती पोर्टलवर भरताना काही तांत्रिक चुका झाल्याची शक्यता शिक्षण विभागातून वर्तविली जात आहे, तर नियमित विद्यार्थ्यांपैकी १७,४६० जणांना प्रावीण्य श्रेणी मिळाली. १७,१३५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. 
 

 

Web Title: For the first time, the 10th district jumped to 99 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.