50 वर्षांत पहिल्यांदाच कापसाची दहा हजारांवर उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 05:00 AM2022-01-06T05:00:00+5:302022-01-06T05:00:34+5:30

जिल्ह्यातील यवतमाळ, फुलसावंगी, राळेगाव, वणी, वाढोणाबाजार, कळंब, घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर या बाजार समित्यांमध्ये बुधवारी कापसाची आवक वाढली. याचवेळी कापसाचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. कापसाचा हमीदर सहा हजार २५ रुपये आहे. तर खुल्या बाजारात कापसाचे दर दहा हजार ४०० रुपये आहेत. शासकीय दर आणि बाजारपेठेतील दरात  चार हजार रुपयांचा फरक आहे.  हमी दराच्या तुलनेत खुल्या बाजारात सध्या ६६ टक्के जादा दराने खरेदी सुरू  आहे.

For the first time in 50 years, cotton jumped to tens of thousands | 50 वर्षांत पहिल्यांदाच कापसाची दहा हजारांवर उडी

50 वर्षांत पहिल्यांदाच कापसाची दहा हजारांवर उडी

Next

यवतमाळ : बुधवारचा दिवस कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरला.  कापसाची अत्यल्प उपलब्धता आणि त्यातच बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी वाढल्याने जिल्ह्यातील चार ठिकाणी कापसाच्या दराने दहा हजाराचा टप्पा ओलांडला. फुलसावंगी बाजारपेठेत कापसाला सर्वाधिक १० हजार ४०० रुपयांचा विक्रमी दर मिळाला. यवतमाळ, राळेगाव आणि वणी बाजारपेठेतही कापसाचा दर दहा हजारांच्या पार झाला. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या ५० वर्षांच्या इतिहासात बुधवारी पहिल्यांदाच कापसाला दहा हजारांहून अधिकचा दर मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सुखावला आहे. पुढील काही दिवस कापसाचे दर चढेच राहण्याचा अंदाज
तज्ज्ञांतून व्यक्त केला जात आहे

३२ हजार क्विंटलची खरेदी 

रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मागणी वाढली आणि पुरवठा  कमी झाला. त्यामुळे गत आठ दिवसांपासून  कापसाचे दर सारखे वाढत होते. त्यातच सरकीचे दर २८०० रुपयांवरून चार हजार रुपये क्विंटलवर पोहोचल्याने खुल्या बाजारपेठेत कापसाच्या दराला झळाळी मिळाली आहे. पर्यायाने जिल्ह्यात कापसाचे दर विक्रमी १० हजाराचा टप्पा ओलांडू शकले. जिल्ह्यात बुधवारी ३२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. 
जिल्ह्यातील यवतमाळ, फुलसावंगी, राळेगाव, वणी, वाढोणाबाजार, कळंब, घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर या बाजार समित्यांमध्ये बुधवारी कापसाची आवक वाढली. याचवेळी कापसाचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. कापसाचा हमीदर सहा हजार २५ रुपये आहे. तर खुल्या बाजारात कापसाचे दर दहा हजार ४०० रुपये आहेत. शासकीय दर आणि बाजारपेठेतील दरात  चार हजार रुपयांचा फरक आहे.  हमी दराच्या तुलनेत खुल्या बाजारात सध्या ६६ टक्के जादा दराने खरेदी सुरू  आहे.  यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी सरासरी २५ ते ३० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होते. यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत केवळ ९ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.  जिल्ह्यातील एकूण उत्पादनाच्या तुलनेत कापसाचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटले आहेत. त्यातच मागणी वाढल्याने दराने उसळी घेतली.
सर्वाधिक खर्चिक पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. या पिकावरील किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी लागते. याशिवाय, खतांचे तीन ते चार डोस द्यावे लागतात. सोबतच, दोन वेळ निंदनही करावे लागते. कापूस वेचाईचा दरही वाढला आहे. वाढता उत्पादन खर्च पाहता कापसाला यंदाच समाधानकार दर मिळाल्याच्या प्रतिक्रिया आहेत. 
दरम्यान, कापसाचे दर सुधारल्यानंतर बुधवारी जिल्ह्यात यवतमाळ आणि वणी विभागात ३२ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी झाली. यामध्ये यवतमाळ चार हजार क्विंटल, राळेगाव पाच हजार क्विंटल, कळंब दोन हजार क्विंटल, पुसद दीड हजार क्विंटल, घाटंजी पाच हजार क्विंटल,  पांढरकवडा तीन हजार क्विंटल, नेर ५०० तर दारव्हा २५०० क्विंटल. 

शेतकऱ्यांनी अंदाज बांधून कापूस ठेवला होता घरातच 
- मागील काही दिवसात कापसाचे दर आठ हजारापेक्षा अधिकच होते. कापसाचे दर आणखी वाढण्याची चिन्हे असल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला होता. मात्र कापूस दराने १० हजारांचा आकडा गाठताच, शेतकऱ्यांनी घरातील कापूस बाहेर काढून तो व्यापाऱ्यांना विकला. बुधवारी या दराने वणी शहरात जवळपास पाच हजार क्विंटल कापूस खरेदी केल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. 

कापसाच्या दराने का घेतली उसळी ?

- कापड उद्योगातील महागाई व दाक्षिणात्य कापड लाॅबीचा दबाव लक्षात घेता सरकार कापूस निर्यातीवर शुल्क आकारेल, अशी अफवा बाजारात दिवाळीच्या काळात होती. त्यामुळे दर किंचित घसरले होते. मात्र निर्यात शुल्क लागू करण्याची कुठलीही तयारी शासन-प्रशासन करीत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बाजारात दरवाढ होण्यास सुरुवात झाली. 
- खान्देशात कापूस मोठ्या प्रमाणात घेतला जातो. मात्र यंदा त्या भागातील शेतकरी कापसाऐवजी सोयाबीनकडे वळले आहेत. दुसरीकडे कापूस वेचणीच्या वेळी पावसाने हजेरी लावली. अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले. त्यातच वातावरणातील बदलामुळे यंदा उत्पादनात मोठ्या  प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे गावागावात फेऱ्या मारूनही व्यापाऱ्यांना कापूस मिळत नाही.  
-  कापूस गाठींचा तुटवडा जाणवू लागल्यानंतरही कापूस महामंडळाने किंवा सरकारने बाजारात कुठलाही हस्तक्षेप केला नाही. शिवाय सरकारने महामंडळाला दिलेले १७ हजार कोटी हे हमीभावाने कापूस खरेदी केलेला तोटा भरुन काढण्यासाठी होता. हे स्पष्ट झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ लागली. त्यातच मागणी वाढल्याने कापसाच्या दराने उसळी घेतली. 

कापसाच्या या आहेत जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठा 
- जिल्ह्यात कापसाची सर्वाधिक उलाढाल राळेगाव बाजार समितीत होते. येथे गुजरात बरोबरच मध्यप्रदेशातूनही व्यापारी खरेदीसाठी येतात. 
- १९२० मध्ये स्थापन झालेल्या घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कापसाची उलाढाल होते. या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात ११३ गावे आहेत. 
- यवतमाळ बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात चार मोठे जीन आहेत. या ठिकाणी लगतच्या तालुक्यातून दरदिवसाला पाच ते सहा हजार क्विंटलची आवक होते. 

कापसासाठी वणी बाजार समितीत झाला होता गोळीबार
- वणी बाजारपेठेत वणी, झरी, मारेगाव व प्रसंगी परजिल्ह्यातीलही शेतकरी कापूस विक्रीसाठी येतो. ६ डिसेंबर २००६ रोजी वणी येथील बाजार समितीच्या यार्डात  कापसाने भरलेल्या सुमारे २ हजार बैलबंड्या कापूस विक्रीसाठी आला होता. चार-पाच दिवस लोटूनही कापूसगाड्या वजनकाट्यावर लावल्या जात नसल्याने शेतकरी चिडून गेले होते.  त्यातून उद्रेक झाला. दगडफेक करून रोष व्यक्त करण्यात आला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी त्या वेळी गोळीबार केला होता. यात बैलबंडीवर उभा असलेला मेंढोली येथील शेतकरी दिनेश घुगूल हा ठार झाला.  परिणामी पुढील काही दिवस वणी शहरात संचारबंदी लागली होती.  

निसर्ग प्रकोपापुढे शेतकरी हवालदिल 
शेतकरी आणि निसर्ग प्रकाेप यांचे गणित एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणाव्या, असे झाले आहे. निसर्ग प्रकोप आणि बाजारभावाशी शेतकऱ्याला सतत संघर्ष करावा लागतो. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी सरकारने इतर देशांप्रमाणे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी द्यायला हवी. याशिवाय, कापसाला नुकसान पोहोचविणाऱ्या किडीवर संशोधन व्हायला हवे. तरच पुढील काळात शेतकरी टिकेल.  
- विजय जावंधिया, कृषी अभ्यासक

दिवाळे निघता निघता थांबले
नुकसानीचा सामना करताना शेतकरी खंगला आहे. कापसाला शेवटच्या टप्प्यात चांगला भाव मिळाला, यामुळे अनेकांचे दिवाळे निघता निघता थांबले. मात्र याचा फायदा मोजक्याच शेतकऱ्यांना होणार आहे. यावर्षी कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. 
- रामकृष्ण पाटील, कृषीभूषण पुरस्कार प्राप्त

हमीभाव योजनाही दरवाढीला कारणीभूत 
अमेरिका व चीनमध्ये यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली. परिणामी भारतात कापसाचे दर अचानक वाढले आहेत. असे असले तरी हा भाव खाली कधी उतरेल, याचा नेम नाही. हमी भाव योजना कायम असल्यानेच खासगी व्यापारी हमी भावापेक्षा चढ्या दराने खरेदी करतात. त्यामुळे ही योजना  चालूच राहिली पाहिजे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या दराने कापसाची खरेदी होत असल्याचा  आनंद आहे. 
-  प्रा. डॉ. करमसिंग राजपूत, अर्थशास्त्राचे अभ्यासक  

खर्चावर आधारित भाव असायलाच हवा
यावर्षी सरतेशेवटी मिळणारे कापसाचे दर पाहता, खूप जास्त भाव मिळाला असे नाही. झालेला खर्च पाहता, हे दर ठीक आहे. यावर आणखी दर मिळाले, तर तो शेतकऱ्यांचा नफा असेल. शेतकऱ्यांना खर्चावर आधारित दर दिले, तर शेतकरी येणाऱ्या काळात निसर्ग प्रकोपाशी सामना करू शकेल.
 - मनीष जाधव, शेतकरी, महागाव 
 

 

Web Title: For the first time in 50 years, cotton jumped to tens of thousands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस