पहिल्यांदाच पुसद मंत्रिमंडळाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 06:00 AM2019-11-29T06:00:00+5:302019-11-29T06:00:05+5:30
पुसदच्या बंगल्याने दिवंगत वसंतराव नाईक, दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने राज्याला मुख्यमंत्री दिले. त्यानंतर मंत्रिमंडळात बंगल्याची धुरा अविनाश नाईक, मनोहरराव नाईक यांनी सांभाळली. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी सत्तेत असताना पुसदच्या बंगल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही असे कधीच झाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्याला साडेतेरा वर्ष मुख्यमंत्री देणाऱ्या पुसदला काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना यावेळी पहिल्यांदाच मंत्रिमंडळाच्या बाहेर रहावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुसद बंगल्याच्या समर्थकांमध्ये काहीशी अस्वस्थता पहायला मिळत आहे.
पुसदच्या बंगल्याने दिवंगत वसंतराव नाईक, दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने राज्याला मुख्यमंत्री दिले. त्यानंतर मंत्रिमंडळात बंगल्याची धुरा अविनाश नाईक, मनोहरराव नाईक यांनी सांभाळली. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी सत्तेत असताना पुसदच्या बंगल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही असे कधीच झाले नाही. भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये मात्र बंगल्याला आमदारकीवर समाधान मानावे लागले. मात्र आघाडी सरकारमध्ये बंगल्याचे कॅबिनेट मंत्रीपद पक्केच होते. राज्यात आघाडी सरकार असताना मनोहरराव नाईकांकडे कॅबिनेट मंत्रीपद होते. यावेळी त्यांचे पुत्र इंद्रनील नाईक पुसद विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. मात्र ज्युनिअर असल्याने त्यांचा मंत्रीपदासाठी विचार केला गेला नाही. मनोहरराव नाईक असते तर पुन्हा पुसदला कॅबिनेट मंत्रीपद नक्कीच मिळाले असते. परंतू यावेळी बंगल्याला केवळ आमदारकीवर समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांचे मिळून महाआघाडीचे सरकार बनले असल्याने आधीच जागा वाटपात मंत्री पदाच्या जागा कमी मिळत आहे. मिळालेल्या जागांमध्ये जातीय व भौगोलिक समतोल राखताना, ज्येष्ठांचे पुनर्वसन करताना प्रमुख पक्षांच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एवढे करूनही अनेक ज्येष्ठांना मंत्रिमंडळाबाहेर बसवावे लागत आहे. अशा वेळी पहिल्यांदाच निवडून आलेला ज्युनिअर आमदारांचा मंत्रिमंडळासाठी विचार होणे शक्यच नाही. म्हणून यावेळी पहिल्यांदाच पुसदच्या नाईक बंगल्याला आघाडीची सत्ता असूनही मंत्रिमंडळाबाहेर रहावे लागण्याची चिन्हे आहेत. याचे शल्य नाईक व बंगल्यांच्या समर्थकांमध्ये पहायला मिळते. मंत्रीमंडळात स्थान मिळणार नसले तरी आमदार इंद्रनील नाईक यांचे मंडळ-महामंडळावर पुनर्वसन केले जावे, अशी समर्थकांंची अपेक्षा आहे. राज्यात ८० लाखांवर बंजारा समाज आहे. या समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळावे अशी बंजारा समाजातील कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र या मागणीचा विचार होण्याची शक्यता अगदीच कमी आहे. पुनर्वसनाचा मात्र नक्कीच विचार केला जाऊ शकतो.
दिग्रस मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रिपद
शिवसेनेचे संजय राठोड पक्षाच्या मंत्रिपदाच्या यादीत टॉप फाईव्हमध्ये आहेत. त्यांना यावेळी बढती देऊन कॅबिनेट मंत्रीपद दिले जाणार आहे. त्यांचा परिवहन, राज्य उत्पादन शुल्क या सारख्या महत्वाच्या खात्यांसाठी प्रयत्न राहू शकतो. राठोड यांच्या निमित्ताने शिवसेनेने बंजारा समाजाला योग्य सन्मान दिल्याचे मानले जाते. दिग्रस मतदारसंघाला या रूपाने पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. यापूर्वी राज्यमंत्री पदावर मतदारसंघाला समाधान मानावे लागले होते.