प्रथमच मुळावा गावाबाहेरचा सदस्य
By admin | Published: February 27, 2017 12:56 AM2017-02-27T00:56:35+5:302017-02-27T00:56:35+5:30
उमरखेड तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळावा गावात यंदा पहिल्यांदाच
६० वर्षात पहिल्यांदा : मतदारांनी दिला परिवर्तनाचा संदेश
उमरखेड : उमरखेड तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळावा गावात यंदा पहिल्यांदाच गावाबाहेरील जिल्हा परिषद सदस्य निवडून आला. मतदारांनी दिलेला हा परिवर्तनाचा संदेश नेमका कुणासाठी हे येणारा काळच ठरवेल.
सुरुवातीला जनपद व नंतर जिल्हा परिषद अस्तित्वात आली. तेव्हापासून आतापर्यंत या गटाचा सदस्य मुळावा गावातीलच होता. ती महत्वपूर्ण भूमिका या गावातील मतदार एकतर्फी कौल देत होते. जनपदच्या काळात देविदास देशमुख सदस्य म्हणून सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी उच्चशिक्षित रामराव चव्हाण या युवकाला त्यावेळी काँग्रेसची उमेदवारी दिली. परंतु मुळावा गावातील नेत्यांना न विचारता उमेदवारी मुळावा गावाबाहेरचा म्हणजे तरोडा येथील उमेदवाराला दिली. म्हणून त्यांच्या विरोधात बंड करीत मुळावा गावातील नागरिकांनी सर्व सामान्य कुटुंबातील भगवान कदम यांना विजयी केले. त्यानंतर सुमारे १२ वर्ष काशीनाथ कानडे हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. १९९७ साली जिल्हा परिषद निवडणूक झाली त्यात काँग्रेसने तरोडा येथील डॉ. विठ्ठल चव्हाण यांना उमेदवारी दिली. तर वाणेगावचे गणेश चव्हाण यांनी बंडखोरी करीत तेथे उभे राहिले. या दोघांचा पराभव करीत मुळावा गावातील उमेदवारांनी २२ वर्षीय तरुण शिवसेनेचे उमेदवार तातू देशमुख यांना विजयी केले. त्यावेळी जिल्ह्यातून एकमेव शिवसेना सदस्य म्हणून ते निवडून आले होते. त्यानंतर देशमुख राष्ट्रवादीमध्ये गेले. नंतर ही जागा राखीव झाली. त्यावेळी काँग्रेसकडून शहाजी खडसे व काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करीत विजय खडसे रिंगणात उतरले. या दोघांची लढत अतिशय चुरशीची झाली. त्यात विजय खडसे अवघ्या ५० मतांनी पराभूत झाले. शहाजी खडसे नंतर जिल्हा परिषदेत सभापती झाले. त्यानंतर प्रतिभा खडसे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. त्यानंतर तातू देशमुख यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी विजय संपादित करीत जिल्हा परिषदेत सभापतीपद भूषविले.
यावर्षी जिल्हा परिषदेत मात्र इतिहास घडला. काँग्रेसने तातू देशमुख यांना उमेदवारी दिली तर शिवसेनेने चितांगराव कदम यांना रिंगणात उतरविले. यावेळी मतदारांनी पहिल्यांदा परिवर्तन करीत मुळावा गावातील उमेदवाराऐवजी बाहेरच्याला पसंती दिली. (शहर प्रतिनिधी)