७० वर्षानंतर प्रधानबोरीत प्रथमच एसटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:12 AM2017-10-13T01:12:35+5:302017-10-13T01:13:04+5:30
देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७० वर्षांचा कालावधी लोटला. परंतु गाव-खेड्यात अजुनही ‘विकास’ काही पोहचलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७० वर्षांचा कालावधी लोटला. परंतु गाव-खेड्यात अजुनही ‘विकास’ काही पोहचलेला नाही. कळंब तालुक्यातील प्रधानबोरी या गावात तर स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर प्रथमच बसचे दर्शन झाले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी एकच जल्लोष केला. कळंब तालुक्यातील इतर अनेक गावांना मात्र अजुनही बसची प्रतिक्षा आहे.
कळंब तालुका हा डोंगराळ भागांनी वेढलेला आहे. जवळपास १४० गावांचा मिळून तालुका बनलेला आहे. परंतु यातील काही गावांना अजुनही बसचे दर्शन झालेले नाही. प्रधानबोरी हेही गाव त्यातीलच एक़ या गावातील नागरिकांना प्रवासासाठी खाजगी वाहन अथवा पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर रुग्णांना खाटेवरुन प्रवास करावा लागायचा. शिक्षणासाठी येथील विद्यार्थी काय पायपीट करीत असतील, हे तर विचारायची सोय नाही. त्यामुळे अनेकांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. प्रवासाची साधनेच नसल्यामुळे हे गाव विकासापासून कोसो दूर आहे. आता या गावात दळणवळणाची सोय झाल्याने नागरिकांच्या पुढील भविष्यासाठी सोयीचे होणार आहे.
बस सुरु झाल्याने या गावात उत्साह संचारला आहे. पहिल्यांदा आलेल्या बसची संपूर्ण गावकºयांवतीने मोठ्या भक्तीभावाने पूजाअर्चा करण्यात आली. चालक गोविंदा मडावी व वाहक संगीता टाक यांचा जंगी सत्कार करण्यात आला. हा दिवस तर गावासाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता. गावात बस आल्यानंतर प्रत्येकाने बसमध्ये चढून आनंद साजरा केला. यवतमाळहून सुटणारी ही बस सकाळी १० व सायंकाळी ५ वाजता येणार आहे. सध्या दोन टाईम सुरु करण्यात आले आहे. बस सुरू करण्यात मुख्यमंत्री दूत नीलेश पाटील, ग्रामपंचायत सचिव गजानन घोरदडे, सरपंच चंद्रशेखर कोटनाके, उपसरपंच रामंचद्र भिसे, पोलीस पाटील गंगाधर भिसे यांची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. दुर्गम भागात बससेवा सुरु करण्यात यश आले याचा आनंद आहे. बससेवेचा इतरही गावांना लाभ मिळाला. मिशनमार्फत सुुरु झालेल्या कामाची ही सुरुवात आहे. येत्या काळात बरीच कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करुन असे मनोगत नीलेश पाटील यांनी व्यक्त केले. तर मुख्यमंत्री मिशनमध्ये गावाची निवड करण्यात आली आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सचिव गजानन घोरदडे यांनी दिली.