खोपडीतील ५ एकर आंबा बागेला फिश नेटचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:37 AM2021-03-14T04:37:11+5:302021-03-14T04:37:11+5:30

मुकेश इंगोले दारव्हा - तालुक्यातील खोपडी (मिरासे) येथील पाच एकरातील आंबा बागेतील झाडांना फिश नेटने झाकून सुरक्षित करण्यात आले. ...

Fish net protection for 5 acre mango orchard in Skull | खोपडीतील ५ एकर आंबा बागेला फिश नेटचे संरक्षण

खोपडीतील ५ एकर आंबा बागेला फिश नेटचे संरक्षण

Next

मुकेश इंगोले

दारव्हा - तालुक्यातील खोपडी (मिरासे) येथील पाच एकरातील आंबा बागेतील झाडांना फिश नेटने झाकून सुरक्षित करण्यात आले. पोपटापासून फळे वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे.

शेतकरी दत्तात्रय राहणे यांच्या केसर जातीच्या आंबा बागेला दरवर्षी चांगला बहर येऊन मोठ्या प्रमाणात फळे लागत होती. परंतु पोपटांचे थवेच्या थवे आंब्यावर तुटून पडत असल्याने त्यांना मोठा फटका बसत होता. त्यामुळे यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी सव्वालाख रुपये खर्च करून ही युक्ती केली. शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून ओळख असलेले दत्तात्रय राहणे शेतीत नवनवीन प्रयोग करतात. २००६ मध्ये त्यांनी कोकण, पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या आंबा बागेची आपल्या शेतात लागवड केली. त्यासाठी त्यांनी सोलापूरवरून केसर जातीच्या ३५ रुपयाप्रमाणे ४३५ कलम आणल्या. या कलम जगविण्यासाठी मेहनत आणि खूप खर्च केला. यापैकी ३३५ झाडे जिवंत राहिली.

सहा वर्षानंतर त्यांनी पहिला बहर घेतला. पहिल्याच वर्षी तब्बल सहा लाख, दुसऱ्या वर्षी चार लाख रुपयांचे उत्पन्न झाले. परंतु कालांतराने मात्र चांगला बहर व फळे येऊनसुद्धा पोपट व इतर पक्ष्यांच्या आक्रमणाने उत्पन्नात मोठी घट व्हायला लागली. दरवर्षी बहर घेण्यासाठी चांगले नियोजन केले जात होते. ज्या झाडाला नवीन पालवी येते, त्याला बहार येतो. त्यामुळे यासंदर्भात जागरूकता ठेवून अशा झाडांना फेब्रुवारी महिन्यातच बहर आल्यानंतर फळे टिकविण्यासाठी सर्व प्रकारे काळजी घेतली जात होती. परंतु एप्रिल, मेमध्ये फळे परिपक्व व्हायला लागताच शेकडोंच्या संख्येने पोपट आक्रमण करीत होते. अनेक प्रकारे अटकाव करण्याचा प्रयत्न करूनही उपयोग झाला नाही.

बॉक्स

१०० निवडक झाडांवर केला प्रयोग

दत्तात्रय राहणे यांनी यावर्षी फळांना वाचविण्यासाठी नवीन प्रयोग केला. हा प्रयोग जास्त खर्चिक असल्याने १०० झाडे निवडून त्यावर सव्वालाख रुपये खर्च करून नायलॉनची फिश नेट लावण्यात आली. यामुळे नक्कीच पोपटांपासून फळे वाचून उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Fish net protection for 5 acre mango orchard in Skull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.