शेतशिवाराला फुटला पाझर

By admin | Published: August 3, 2016 01:25 AM2016-08-03T01:25:45+5:302016-08-03T01:25:45+5:30

दरवर्षी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदा आता पाऊस नको, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

Fishery leakage to the farmland | शेतशिवाराला फुटला पाझर

शेतशिवाराला फुटला पाझर

Next

विहिरीही ओव्हर फ्लो : शेतकरी म्हणतात, वरुणराजा आता तरी थांबना !
ज्ञानेश्वर मुंदे यवतमाळ
दरवर्षी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदा आता पाऊस नको, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. गत महिनाभरापासून दररोज कोसळत असलेल्या पावसाने शेतशिवारांना अक्षरश: पाझर फुटले आहे. पिकांच्या सऱ्यांमधून पाणी खळखळून वाहत आहे. तर तुडुंब झालेल्या विहिरीतील पाणी उपसण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. आॅगस्टच्या पहिल्याच दिवशी वार्षिक सरासरीच्या ७० टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी यंदा शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे सावट घोंगावत आहे.
गत काही वर्षात यवतमाळ जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट होते. अपुऱ्या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला होता. मात्र यंदा हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे जोरदार पाऊस कोसळत आहे. जुलै महिन्यात तर एकही दिवस पावसाने उसंत घेतली नाही. आताही पाऊस थांबायचे नाव घेत नाही. जो दिवस उजाडतो तो ढगाळी वातावरण आणि पाऊस घेऊनच. अतिपावसाने आता शेतातील पिके धोक्यात आली आहे. पानथळ जमीन असलेल्या शेतात तर अक्षरश: पाण्याचे लोट वाहत आहे. तर काळ्या कसदार शेतातही पाणी साचले आहे. अनेक शेतातील पिकातून पाणी वाहताना दिसत आहे. पाऊस थांबत नसल्याने शेतात आंतरमशागतीचे कामे खोळंबली आहे. तर पिकेही पिवळी पडायला लागली आहे. नदी, नाल्या तीरावरील शेतांना पुराचा फटका बसत आहे. अनेकांची शेती खरडून गेली असून काहींच्या विहिरी अतिपावसाने खचल्या आहेत.
शेत शिवारात असलेल्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली असून विहिरी तुडुंब भरलेल्या दिसत आहे. विहिरीत पाणी शेतात जाऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मोटारपंप लावून पाणी उपसणे सुरू केले आहे. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास जिल्ह्यात ओला दुष्काळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सततच्या पावसाला नागरिकच नव्हे तर आता शेतकरीही कंटाळले आहे. आता वरूण राजाने विश्रांती घ्यावी, अशी विनवणीच शेतकरी करताना दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी आहे. २ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६३७.९८ मिमी पावसाची नोंद झाली. वार्षिक सरासरीच्या ७०.९४ टक्के हा पाऊस आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात केवळ ३०३.७१ मिमी पावसाची नोंद झाली होती. महागाव तालुक्यात तर वार्षिक सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला आहे. कळंंब वगळता बहुतांश तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस कोसळला आहे. कळंब तालुक्यात मात्र आतापर्यंत ४७.२५ टक्के पाऊस कोसळला आहे.

पीक वाचविण्याची धडपड
जिल्ह्यात बहुतांश क्षेत्रावर सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांची लागवड झाली आहे. सध्या या पिकांना सततच्या पावसाचा धोका निर्माण झाला आहे. तर तुरीचे पीक हे पिवळे पडले असून वेळीच पाऊस थांबला नाही तर तूर हातची जाण्याची चिन्हे आहेत. कृषी विभागाकडून अशा स्थितीत कुठल्या उपाययोजना कराव्या याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळण्याची आवश्यकता आहे. मात्र नेहमीप्रमाणे कृषी विभागाचे तज्ज्ञ चुप्पी साधून आहेत.

Web Title: Fishery leakage to the farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.