वन्यजीवांच्या गळ्याला फास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:48 PM2018-04-17T23:48:17+5:302018-04-17T23:48:17+5:30
तापत्या उन्हाने जंगलातील पाणवठे आटले असून पाण्याच्या शोधात वन्यजीव शेतशिवारात भटकत असल्याचे दिसून येत आहे. नेमकी ही बाब हेरून शिकारी सक्रीय झाले असून वन्यजीवांच्या शिकारीसाठी शेतशिवारात फास लावले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तापत्या उन्हाने जंगलातील पाणवठे आटले असून पाण्याच्या शोधात वन्यजीव शेतशिवारात भटकत असल्याचे दिसून येत आहे. नेमकी ही बाब हेरून शिकारी सक्रीय झाले असून वन्यजीवांच्या शिकारीसाठी शेतशिवारात फास लावले जात आहेत. या सापळ्यात अडकून अनेक जनावरे शिकाऱ्यांच्या हाती सापडत आहेत. वनविभाग मात्र या विषयात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
रविवारी सकाळी निळापूर गावालगतच्या शेतशिवारात लावलेल्या सापळ्यात ससा अडकला. मात्र तो शिकाºयाच्या हाती लागण्याअगोदरच एका श्वानाने त्याच्यावर ताव मारला. असेच सापळे अनेक ठिकाणी लावले जात असून वन्यजीवांची बेमालूमपणे शिकार केली जात आहे. वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. या जंगलात वाघासह सर्वच प्रकारच्या प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यात हरिण, ससे, मोर, रानडुक्कर, नीलगाय, रोही आदी वन्यजीव मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मागील हंगामात अतिशय कमी पाऊस पडल्याने यंदा डिसेंबर महिन्यातच जंगलातील सर्व नैसर्गिक जलस्त्रोतांनी तळ गाठला. सध्या एप्रिल महिन्या सुरू असून उन्हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तहानेने व्याकूळ वन्यजीव पाण्याच्या शोधात लोकवस्त्यांकडे धाव घेत आहेत. त्याचा फायदा घेत शिकाऱ्यांकडून वन्यजीवांची शिकार केली जात असल्याचे दिसते.
अन्नसाखळीला धोका
लहान-लहान वन्यजीवांच्या शिकारी वाढल्याने प्राण्यांच्या अन्नसाखळीला धोका निर्माण झाला आहे. वन्यजीवांची अन्नसाखळी एकमेकांवर निर्भर असते. मात्र मोर, रानडुकर, ससे यांच्या शिकारी या भागात मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्याने या प्राण्यांची संख्या वेगाने घटत असल्याचे निदर्शनास येत आहे. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची वन्यप्रेमींची मागणी आहे.