फिट इंडिया; खेळा, लिहा अन् २५ लाखांचे बक्षीस मिळवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 07:00 AM2021-06-29T07:00:00+5:302021-06-29T07:00:12+5:30
Yawatmal news Fit India अभ्यासासोबतच विद्यार्थी शारीरिक-मानसिक तंदुरुस्त बनावा यासाठी देशात फिट इंडिया मोहीम सुरू आहे. यंदा या मोहिमेच्या तिसऱ्या वर्षी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी ऑनलाइन ‘स्पोर्ट क्विझ’ स्पर्धा घेतली जाणार आहे.
अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अभ्यासासोबतच विद्यार्थी शारीरिक-मानसिक तंदुरुस्त बनावा यासाठी देशात फिट इंडिया मोहीम सुरू आहे. यंदा या मोहिमेच्या तिसऱ्या वर्षी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी ऑनलाइन ‘स्पोर्ट क्विझ’ स्पर्धा घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे यात जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ लाखांचे घसघशीत बक्षीस शासनातर्फे दिले जाणार आहे.
केंद्रीय युवक कल्याण मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या वतीने हे आयोजन करण्यात आले असून, यात बक्षिसापोटी तीन कोटी २५ लाखांचा खर्च केला जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना खेळाविषयीची माहिती जाणून घेऊन या स्पर्धेत ऑनलाइन उत्तरे देऊन वैयक्तिकरीत्या एक ते २५ लाखांपर्यंतचे बक्षीस पटकावता येणार आहे. याशिवाय चमू म्हणून शाळेलाही बक्षीस दिले जाणार आहे.
राज्यातील प्रत्येक शाळेने या स्पर्धेत विद्यार्थी सहभागी व्हावे, असे लेखी आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले आहेत.
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना १ जुलैपासून फिट इंडियाच्या संकेत स्थळावर नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर चार फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा होईल. ऑगस्टमध्ये पहिली फेरी शाळास्तरावर होऊन प्राथमिक फेरीसाठी विद्यार्थी निवडले जातील. या फेरीतून निवडलेले विद्यार्थी राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरतील. त्यात पात्र ठरलेले विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र असतील. ही राष्ट्रीय फेरी १ ते १४ नोव्हेंबरदरम्यान घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे या सर्व फेऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून देशात एकाच वेळी घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे देशभरातील कोट्यवधी विद्यार्थी एकाच वेळी क्रीडा-खेळ याविषयी विचार करताना पहायला मिळणार आहेत.
पालकांना फोन करा, उत्तर विचारा
नववी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थी स्पर्धेसाठी पात्र आहेत. विशेष म्हणजे ही स्पर्धा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी या स्पर्धेदरम्यान ‘फोन अ टीचर’, ‘फोन अ पॅरेन्ट’ असे प्रकारही ठेवले जाणार आहेत. म्हणजेच एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थ्यांना फोनद्वारे पालक किंवा शिक्षकाशी चर्चा करता येणार आहे. विशेष म्हणजे फोनद्वारे असे मार्गदर्शन करणाऱ्यांनाही तब्बल नऊ लाख ६९ हजारांची बक्षिसे दिले जाणार आहेत. शिवाय देशभरातील विद्यार्थ्यांना सहज सहभाग घेता यावा यासाठी ही स्पर्धा इंग्रजी, हिंदी, मराठीसह १३ भाषांमध्ये घेतली जाणार आहे.