यवतमाळसह पाच विमानतळ १५ वर्षांनंतर पुन्हा एमआयडीसीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:40 IST2025-04-09T11:39:18+5:302025-04-09T11:40:09+5:30

अखेर रिलायन्सच्या विळख्यातून सुटका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सामंत यांचा धाडसी निर्णय

Five airports including Yavatmal will be returned to MIDC after 15 years | यवतमाळसह पाच विमानतळ १५ वर्षांनंतर पुन्हा एमआयडीसीकडे

Five airports including Yavatmal will be returned to MIDC after 15 years

विशाल सोनटक्के 
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगाने विकास व वापराबाबत पंधरा वर्षे कुजविलेले राज्यातील यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव व बारामती हे पाच विमानतळ अखेर मंगळवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने अंमलात आणला. आता इतर विमानतळांप्रमाणेच हे विमानतळही नवी कात टाकतील, अशी आशा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने या विमानतळांभोवतीचा फास अखेर सुटला आहे. मंगळवारी एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रिलायन्सकडून या विमानतळांच्या एमआयडीसीकडे हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली.


आधुनिकीकरण व विस्ताराच्या अपेक्षेने राज्य सरकारने यवतमाळचे जवाहरलाल दर्डा विमानतळ अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाकडे दिले होते. परंतु रिलायन्सने हे सुरू असलेले विमानतळ बंद पाडले. विस्तार सोडा परंतु अक्षरशः विमानतळाचे वाटोळे केले. अशीच अवस्था राज्यातील इतर चार विमानतळांचीही झाली. या प्रकारामुळे औद्योगिकरणालाही मोठी खीळ बसली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयक्षमतेमुळे आता या विमानतळासह राज्यातील लातूर, नांदेड, धाराशिव व बारामती ही पाच परत एमआयडीसीकडे आले आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांनी उद्योगमंत्री असताना मागास जिल्ह्यांमध्ये उद्योग-व्यवसायांना गती मिळावी, तसेच रोजगाराच्या संधी वाढाव्यात, विमानतळ उभारणीचे धोरण आणले. त्यातूनच कापसाची पंढरी असलेल्या यवतमाळ येथे विमानतळाची उभारणी झाली. रेमंडसारखा मोठा उद्योग ही त्या पुढाकाराची पहिली फलश्रुती होती. मात्र, २००९ मध्ये यवतमाळ, लातूर, नांदेड, धाराशिव व बारामती ही पाच विमानतळे ६३ कोटींच्या बोलीत अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एअरपोर्ट डेव्हल्पमेंटकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर या विमानतळांची दुर्दशा झाली. विकासाला खीळ बसली. त्यामुळे हे विमानतळ रिलायन्सकडून काढून घेऊन पूर्ववत एमआयडीसीकडे सोपवावे, अशी मागणी होत राहिली. राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी सातत्याने लावून धरली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही पुढाकार घ्यावा, यासाठी प्रयत्न झाले. या अनुषंगाने एमआयडीसीने रिलायन्स कंपनीला तीन वेळा नोटीस बजावली. मात्र, रिलायन्सकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मंगळवारी हे सर्व पाच विमानतळ रिलायन्सकडून पुःनश्च एमआयडीसीकडे हस्तांतरित करून घेण्यात आले. यवतमाळ येथे याप्रसंगी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए. बी. दाभेराव, प्रादेशिक अधिकारी स्नेहा पिंपरीकर-नंद, प्रमुख भूमापक जी. एस. बारसकर यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जागेचे मोजमाप करून पंचनामा झाल्यानंतर एमआयडीसीने विमानतळाचा ताबा घेतला.


आता पूर्ण क्षमतेने विमानतळ कार्यान्वित व्हावे - डॉ. दर्डा
रिलायन्स समूहाकडून विमानतळ काढून घेण्याच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांना धन्यवाद देत लोकमत' एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या मागणीनुसार तातडीने हालचाली करून सरकारने हे विमानतळ पुःनश्च एमआयडीसीकडे घेतले आणि या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळकरांना दिलेली ही मोठी भेट आहे. या निर्णयामुळे यवतमाळच्या औद्योगिक विकासाचा मार्ग प्रशस्त झाला असून आता हे विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. धावपट्टी आणखी वाढविल्यास यवतमाळ येथेही बोइंगसारखी मोठी विमाने सहज उतरू alaugh शकतील. तेव्हा, धावपट्टी वाढवावी तसेच नाईट लॅन्डिंगची सुविधा उपलब्ध करून पूर्ण क्षमतेने हे विमानतळ कार्यान्वित करावे, असे डॉ. विजय दर्डा म्हणाले.

Web Title: Five airports including Yavatmal will be returned to MIDC after 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.