पाच एटीएमधारकांचे लाखावर पैसे परस्पर लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 05:00 AM2021-08-05T05:00:00+5:302021-08-05T05:00:22+5:30

अभियंता श्रीकांत खराबे यांच्याकडे एसबीआयचे एटीएम कार्ड आहे. मंगळवारी त्यांच्या खात्यातून १० हजार रुपये काढल्याचा एसएमएस आला. खराबे यांनी याची सखोल चौकशी केली असता एटीएमचा वापर करीत परस्परच कुणी तरी ३० हजार रुपये काढल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे खराबे यांनी ३१ जुलैपूर्वी सत्यसाई ज्योत मंगल कार्यालयाजवळील एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढले होते. त्यानंतर त्यांनी कुठलेही ट्रान्झॅक्शन केले नाही.

Five ATM holders spend lakhs on each other | पाच एटीएमधारकांचे लाखावर पैसे परस्पर लंपास

पाच एटीएमधारकांचे लाखावर पैसे परस्पर लंपास

googlenewsNext

सुरेंद्र राऊत 
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील एसबीआयचे एटीएम कार्डधारक ठगांच्या रडारवर आले आहे. दोन दिवसात ठगांनी पाच जणांच्या बँक खात्यातून एटीएमद्वारे रोख रक्कम उडविली आहे. हा प्रकार लक्षात येताच बुधवारी स्टेट बँक चौक स्थित मुख्य शाखेत ग्राहकांची गर्दी जमली होती. परस्पर पैसे काढल्याच्या तक्रारी घेऊन नागरिक येथे पोहोचत होते. एटीएम क्लोन करून पैसे उडविण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. 
अभियंता श्रीकांत खराबे यांच्याकडे एसबीआयचे एटीएम कार्ड आहे. मंगळवारी त्यांच्या खात्यातून १० हजार रुपये काढल्याचा एसएमएस आला. खराबे यांनी याची सखोल चौकशी केली असता एटीएमचा वापर करीत परस्परच कुणी तरी ३० हजार रुपये काढल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे खराबे यांनी ३१ जुलैपूर्वी सत्यसाई ज्योत मंगल कार्यालयाजवळील एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढले होते. त्यानंतर त्यांनी कुठलेही ट्रान्झॅक्शन केले नाही. राजेश कोलवाडकर यांच्या खात्यातून ४० हजार रुपये काढल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी उघड झाला. त्याचप्रमाणे जितेश दवारे यांच्या खात्यातूनही १३ हजार रुपये परस्पर उडविले. यासोबतच घाटंजी येथील तलाठी बारसे व इतर दोन नागरिकांना ठगाने गंडा घातला आहे. विशेष म्हणजे यातील सर्व एटीएम कार्डधारकांनी शेवटचे ट्रान्झॅक्शन हे सत्यसाई ज्योत मंगल कार्यालय परिसरातील एटीएमवरच केले आहे. पैसे निघाल्याचे आढळताच सर्वांनी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत धाव घेतली. तेथे तत्काळ एटीएम ब्लॉक करण्यात आले. बिश्वास मार्केट रायगंज येथून हे पैसे काढल्याचे दिसत आहे. यावरून एटीएम कार्ड क्लोनिंगचा संशय बळावला आहे.  सतर्क असण्याची गरज आहे. 

असे होते एटीएम कार्डचे क्लोनिंग
- एटीएम सेंटरवर छुप्या पद्धतीने डिव्हाईस लावण्यात येते. हे डिव्हाईस परिसरातच उभ्या असलेल्या वाहनातील लॅपटॉपशी वायफायने कनेक्ट असते. एटीएम कार्ड घेऊन सेंटरवर आलेली व्यक्ती कार्ड ऑपरेट करीत असताना त्या डिव्हाईसमध्ये डाटा स्कॅन होतो. हा स्कॅन झालेला डाटा तत्काळ लॅपटॉपवर सेव्ह केला जातो. याच माहितीवरून दुसरे एटीएम तयार केले जाते. याला क्लोनिंग असे म्हणतात. 

शोल्डर मूव्हमेंटवरून पासवर्ड लिंक
- एटीएमवर पैसे काढताना आपण मागे पुढे कोण आहे यावर लक्ष देत नाही. ठगांकडून समोरच्या व्यक्तीच्या खांद्याच्या हालचालीवरून त्याचा पासवर्ड काय हे ओळखले जाते. क्लोन केलेले एटीएम कार्ड आणि शोल्डर मूव्हमेंटवरून मिळालेला पासवर्ड ठगांसाठी सुवर्णसंधी असते. ते बिनबोभाटपणे बँक खात्यातून रक्कम काढू शकतात. असाच प्रकार यवतमाळात घडला आहे. 
 

एटीएमने पैसे काढल्याच्या पाच तक्रारी आल्या आहेत. त्याचा शोध घेतला जात आहे. बॅंकेच्या तांत्रिक शाखेकडे प्रकरण देण्यात आले आहे. त्यांच्याकडून आलेला अहवाल पोलिसांना पुढील तपासासाठी दिला जाणार आहे.  
- राजीव कुमार,
व्यवस्थापक, मुख्य शाखा 
स्टेट बॅंक यवतमाळ.

परस्पर बँक खात्यातून पैसे काढल्याच्या दोन तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. प्रथमदर्शनी यात एटीएम कार्डचे क्लोनिंग करून ठगांनी पैसे उडविले असावे, असा अंदाज आहे. या तक्रारीचा शोध घेतला जात आहे. पैसे परत मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. 
- अमोल पुरी,
 सायबर सेल प्रमुख, यवतमाळ

 

Web Title: Five ATM holders spend lakhs on each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम