चारशे रुपयांच्या गणवेशासाठी पाचशेच्या बँक खात्याची सक्ती
By admin | Published: July 11, 2017 01:06 AM2017-07-11T01:06:23+5:302017-07-11T01:06:23+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निधी तब्बल १५ दिवस विलंबाने जिल्हा स्तरावर पोहोचला आहे.
अखेर गणवेश निधी आला : विद्यार्थी-पालक गोंधळात
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निधी तब्बल १५ दिवस विलंबाने जिल्हा स्तरावर पोहोचला आहे. मात्र, अद्याप तो शाळा स्तरावर पोहोचलेला नसल्याने गणवेशाचे वांदे झाले आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्यासाठी पाचशे रुपये खात्यात जमा ठेवण्याची सक्ती केली जात आहे. त्यातून चारशेच्या गणवेशासाठी पाचशेचा भुर्दंड पालकांना पडणार आहे.
जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींकरिता सर्वशिक्षा अभियानातून यंदा मोफत गणवेश मिळणार नाही. तर त्याऐवजी दोन गणवेशाकरिता ४०० रुपये त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत. परंतु, २७ जूनला शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटल्यावरही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून जिल्ह्याला निधी देण्यात आला नाही. अखेर मुंबईत झालेल्या तातडीच्या बैठकीनंतर गुरूवारी ६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी जिल्हा स्तरावर वळता करण्यात आला. मात्र, अद्याप जिल्हा परिषद सीईओंची स्वाक्षरी होऊन निधी शाळा स्तरावर पोहोचण्याची प्रक्रिया बाकी आहे.
बुधवारनंतर गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात टाकण्यात येईल, असे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. पालकांनी मुला-मुलींना आधी गणवेश खरेदी करून दिल्यानंतर ४०० रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहे. मात्र, अनेक पालकांनी विद्यार्थ्यांचे खाते अद्यापही उघडलेले नाही. तर काही बँका ५०० रुपये जमा ठेवल्याशिवाय खाते पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यास तयार नाही. ४०० रुपयांसाठी ५०० रुपये जमा करण्याची वेळ पालकांवर आली आहे. त्यामुळे गणवेशाचा निधी थेट मुख्याध्यापकाच्या खात्यात जमा करण्यात यावा, अशी मागणी इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशनने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
अर्धे तुमचे, अर्धे आमचे
आठवीचा गणवेश २०० रुपयात कुठे मिळत असेल तर अधिकाऱ्यांनी आणून दाखवावा, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली. पालकांना आता अर्धे सरकारचे अर्धे स्वत:चे पैसे टाकूनच गणवेश घ्यावा लागेल.