माजी नगराध्यक्षांसह कुटुंबातील पाच जखमी
By admin | Published: November 15, 2015 01:42 AM2015-11-15T01:42:02+5:302015-11-15T01:42:02+5:30
माजी नगराध्यक्ष राजूभैया ऊर्फ चंद्रशेखर जयस्वाल यांच्या वाहनाला अपघात होऊन त्यांच्यासह परिवारातील पाच जण गंभीररित्या जखमी झाले.
झाडाला धडक : कळमनुरीजवळ जयस्वाल परिवारावर आघात
उमरखेड : माजी नगराध्यक्ष राजूभैया ऊर्फ चंद्रशेखर जयस्वाल यांच्या वाहनाला अपघात होऊन त्यांच्यासह परिवारातील पाच जण गंभीररित्या जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री ११ वाजता कळमनुरी-शेंबाळपिंपरी रोडवर बाभळी गावाजवळ झाला. जखमींना नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
या अपघातात माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल (५५), त्यांच्या पत्नी सुरेखा जयस्वाल (५०), मुलगा मिथिलेश जयस्वाल (२५), सून पूनम जयस्वाल (२३), शिवाणी जयस्वाल (२) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहे. या सर्वांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीररीत्या मार लागला आहे. उमरखेड येथील जयस्वाल परिवार शुक्रवारी काही कामानिमित्त दुपारीच हिंगोली येथे गेला होता. काम आटोपून रात्री ते आपल्या गाडीने (एम.एच.२९/४५६) उमरखेडकडे परत निघाले होते. दरम्यान, कळमनुरी ते शेंबाळपिंपरी मार्गावर बाभळी फाट्याजवळ रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात गाडीवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित गाडी रस्त्यालगतच्या झाडावर धडकली. यावेळी मिथीलेश जयस्वाल हे गाडी चालवित होते. जबर धडक बसल्यामुळे गाडीतील पाचही जण गाडीबाहेर फेकल्या गेले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. रात्री ११ वाजताची वेळ असल्यामुळे रस्ता सुनसान होता. मदतीसाठीही कोणीच नव्हते. अचानक शेंबाळपिंपरी येथील नीलेश नवलचंद सोनी यांच्या मालकीची गाडी घेऊन शेख शकील शेख करीम (३०) रा.इसापूर धरण हा युवक त्याच रस्त्याने आला. रात्रीची वेळ असूनही अपघात झाल्याचे दिसताच त्याने गाडी थांबवून विचारपूस केली. जखमी उमरखेडचे जयस्वाल असल्याचे कळताच त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या इतर एक-दोन वाहनांना थांबविले व जखमींना शेंबाळपिंपरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. परंतु त्यावेळी आरोग्य केंद्रात कोणताही डॉक्टर किंवा कर्मचारी हजर नव्हता. शेवटी रुग्णवाहिकेवरील डॉ.बांधे आणि खासगी डॉ.मदन चंदेल यांनी प्राथमिक उपचार केला. परंतु गंभीर मार लागलेला असल्यामुळे सर्व जखमींना तातडीने पुसदवरून नागपूरला हलविण्यात आले. नागपूर येथे उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. (शहर प्रतिनिधी)