आयुष्यभर जमविलेले पाच लाख गरिबांच्या लेकीबाळींसाठी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:02 AM2017-09-27T01:02:20+5:302017-09-27T01:03:27+5:30
नगरपालिकेत कष्ट उपसताना पगार फार नाही. तरी पोटाला चिमटा घेत आयुष्यभर पै-पै गोळा केली. निवृत्त झाले तेव्हा वृद्ध दाम्पत्याची जमापुंजी भरली पाच लाख रूपये.
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : नगरपालिकेत कष्ट उपसताना पगार फार नाही. तरी पोटाला चिमटा घेत आयुष्यभर पै-पै गोळा केली. निवृत्त झाले तेव्हा वृद्ध दाम्पत्याची जमापुंजी भरली पाच लाख रूपये. उर्वरित आयुष्य सुखात घालविण्यासाठी पुरेसे होते. पण त्यांनी उतारवयातही इतरांच्या लेकीबाळींचा विचार केला. पाचही लाख गोरगरिबांच्या लेकीचे संसार उजविण्यासाठी त्यांनी दान करून टाकले. मधुकरराव लांडोळे आणि प्रयागबाई लांडोळे यांची ही दानत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
नेर येथील न्यू इंग्लिश हायस्कूलचे प्राध्यापक मनोज दुधे यांचे काका मधुकरराव संवेदनशील स्वभावामुळ सर्वपरिचित आहेत. ते अमरावती महापालिकेत कार्यरत होते. तुटपुंज्या वेतनातही मधुकरराव लांडोळे आणि प्रयागबाई यांनी सुखाचा संसार करून दाखविला. त्यांच्या पोटी जन्मलेल्या दोन मुलांना लहानपणापासूनच स्वावलंबनाचे धडे दिले. तरुणवयात त्यांना चहा कॅफेसारखे छोटे व्यवसाय सुरू करून दिले. आज तेही आपल्या मेहनतीच्या कमाईत खूश आहेत.
मधुकरराव लांडोळे यांनी आयुष्यभर गोळा केलेल्या पाच लाखांच्या कमाईतून गरिबांना दिलासा देण्याचा विचार केला. गरिबांच्या लेकींचे लग्न हुंड्यासाठी, लग्नातील खर्चासाठी अनेकदा अडते. वधुपित्याला मानहानीही सोसावी लागते. त्यामुळे मधुकररावांनी या लेकीबाळींसाठीच आपली कमाई दान केली. ही पाच लाखांची रक्कम त्यांनी बारी पंचायत फंड बडनेरा यांना देणगी म्हणून दिली आहे. इतरांच्या लेकींना सुख आणि स्वत:च्या मुलांना स्वावलंबन देणारे मधुकरराव आणि प्रयागबाई यांचे कौतुक होत आहे.