नारिंगेनगरात पाच लाखांची घरफोडी
By admin | Published: November 1, 2014 01:11 AM2014-11-01T01:11:35+5:302014-11-01T01:11:35+5:30
देवदर्शनासाठी कुटुंबासमावेत गेलेल्याचे घर फोडून चोरट्यांनी हिरेजडीत सोन्याच्या अंगठ्यांसह अज्ञात चोरट्याने सुमारे पाच लाखांचा ऐवज लंपास केला.
यवतमाळ : देवदर्शनासाठी कुटुंबासमावेत गेलेल्याचे घर फोडून चोरट्यांनी हिरेजडीत सोन्याच्या अंगठ्यांसह अज्ञात चोरट्याने सुमारे पाच लाखांचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये ९० गॅ्रम सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. घरफोडीची ही घटना येथील नारिंगे नगरात गुरूवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
यवतमाळ येथील नारिंगेनगरात शालीन प्रवीण शुक्ला यांचे घर आहे. दिवाळी सुट्या असल्याने ते परिवारासह शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेले. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. देवदर्शन आटोपून रात्री १२ वाजताच्या सुमारास ते परिवारासोबत घरी परतले. यावेळी त्यांना घराच्या दाराचा कुलूप कोंडा तुटलेला दिसला. त्यामुळे त्यांनी तत्काळ घराची पाहणी केली.
त्यामध्ये कपाटातील दोन हिरेजडीत सोन्याच्या अंगठ्या, ३५ ग्रॅम वजनाचे तीन सोन्याचे मंगळसूत्र, २५ ग्रॅम वजनाच्या बांगड्या, १० ग्रॅम सोन्याची साखळी आणि २५ ग्रॅम लॉकेट असा एकूण पाच लाख रूपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. शुक्ला यांनी तत्काळ घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यावरून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घराची बारकाईने पाहणी केली. तसेच वरिष्ठांना माहिती देऊन पोलीस श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. मात्र श्वानाला स्मेल देताच ते काही अंतर चालून घुटमळले. ठसे तज्ज्ञांच्या पाहणीतही फारसे काही निष्पन्न झाले नाही. घटनेनंतर पोलिसांनी शालीन शुक्ला यांच्याकडून रितसर तक्रार घेतली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील कुलूप बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने अनेक कुटुंब बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे घराला कुलूप आहे. या संधीचा फायदा चोरटे घेत आहे. अनेक भागात लहान मोठ्या चोऱ्या होत आहे. अनेक जण तर लहान सहान चोरीची तक्रारही द्यायला पुढे येत नाही. शहरात वाढत्या चोऱ्या होत असल्या तरी पोलीस मात्र चोरट्यांना पकडण्यात अद्याप यशस्वी झाले नाही.