पाचही आमदार मांडणार लेखाजोखा
By admin | Published: October 15, 2015 02:52 AM2015-10-15T02:52:30+5:302015-10-15T02:52:30+5:30
जिल्ह्यातील भाजपाचे पाचही आमदार गेल्या वर्षभरात आपल्या विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणकोणती कामगिरी केली,
युती सरकारची वर्षपूर्ती : मुंबईत आज बैठक
यवतमाळ : जिल्ह्यातील भाजपाचे पाचही आमदार गेल्या वर्षभरात आपल्या विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणकोणती कामगिरी केली, याचा लेखाजोखा गुरुवारी १५ आॅक्टोबर रोजी मुंबईत मांडणार आहे.
भाजपा-शिवसेना युती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व भाजपा आमदारांची खास बैठक गुरुवारी मुंबईत होत आहे. या बैठकीसाठी भाजपाचे यवतमाळचे आमदार मदन येरावार, राळेगावचे आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने, आर्णी-केळापूरचे आमदार प्रा.राजू तोडसाम आणि वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार बुधवारी सायंकाळी रवाना झाले. या आमदारांनी आपल्या वर्षभरातील कामगिरीचा मोठा अहवालच सोबत नेला आहे. गेल्या वर्षभरात आपल्या विधानसभा मतदारसंघात कोणती विकास कामे केली, पक्ष-संघटन वाढीच्या दृष्टीने नेमक्या काय योजना आखल्या, किती ग्रामपंचायतींवर आपल्या गटाचे वर्चस्व मिळविले, आता १ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी काय व्यूहरचना केली, मुख्यमंत्र्यांचे मिशन असलेल्या जलयुक्त शिवारमध्ये विधानसभा मतदारसंघात किती पाणी साठले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृतीच्या काय उपाययोजना हाती घेतल्या, अशा विविध पैलूंनी जिल्ह्यातील पाचही आमदारांकडून आढावा घेतला जाणार आहे.
त्या दृष्टीने आमदारांनीही तयारी केली आहे. बरेच काही दाखविण्याचा प्रयत्न या आमदारांकडून होणार असला तरी प्रत्यक्षात त्यांच्या मतदारसंघात गेल्या वर्षभरात खरोखरच काय कामगिरी झाली हे तपासणे सरकार व पक्ष श्रेष्ठींसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामपंचायती या पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नाहीत, म्हणून अनेक ग्रामपंचायतींवर आपलाच वरचष्मा असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न आमदारांकडून होण्याची शक्यता आहे.
अनेक विधानसभा मतदारसंघात आजही सत्ताधारी भाजपा पेक्षा काँग्रेसच्याच आमदारांची वेगाने आणि अधिक संख्येने कामे होत असल्याचे बोलले जाते. भाजपाच्या ताब्यातील या मतदारसंघांमध्ये अद्यापही काँग्रेसचेच वर्चस्व प्रशासनात पहायला मिळते. सत्ताधारी आमदाराएवढाच किंवा काही ठिकाणी त्या पेक्षाही अधिक सन्मान अधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या पराभूत आमदार व नेत्यांना दिला जात असल्याची भाजपा कार्यकर्त्यांची भावना आहे. निवडणुकीत जीवाचे रान करून आमदारांना निवडून आणले, मात्र आता त्यांच्या भोवती उपरे आणि दलालांचाच विळखा राहतो, कार्यकर्त्यांना साध्या भेटीसाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते, घेऊन आलेल्या कामाचे तर दूरच अशा शब्दात भाजपाचे सामान्य कार्यकर्ते आमदारांप्रती आपली नाराजी अवघ्या वर्षभरातच बोलून दाखवित आहे.
भाजपा-शिवसेना सत्तेत असले तरी वणीत या पक्षाच्या नेत्यांमधील वाक्युद्ध सर्वांनाच अनुभवायला मिळाले. सूत गिरणीची निवडणूक त्याचे निमित्त ठरली. सूत गिरणीत २१ पैकी सर्वाधिक ११ जागा मिळवूनही भाजपाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांना आपला अध्यक्ष बसविता आला नाही. आमदारांच्या खेळीला काँग्रेसने सुरुंग लावला. त्याला सेनेची साथ असल्याचा भाजपाचा आरोप आहे. त्यातूनच सेना व भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांवर जाहीर आरोप केले. (जिल्हा प्रतिनिधी)
शिवसेनेच्या ‘ट्रिटमेंट’ची चाचपणी
राज्यातील भाजपा आमदारांच्या या जम्बो बैठकीमागे वर्षपूर्ती हे प्रमुख कारण सांगितले गेले असले, तरी प्रत्यक्षात शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेबाबत आमदारांची मते जाणून घेतली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. जिल्ह्यातील पाचही आमदार विकास निधी, पक्ष विस्तार, मानसन्मान आदी मुद्यांवरून शिवसेनेपासून दुखावले आहेत. मात्र अद्याप त्याबाबत त्यांनी जाहीर वाच्छता केलेली नाही. पक्ष स्तरावर मात्र त्यांनी ही बाब वेळोवेळी पोहोचविली आहे. पालकमंत्री पद शिवसेनेकडे असल्याने सामाजिक, शासकीय आणि विकास कामांमध्ये सेनेचाच वरचष्मा राहतो, निधीसाठीही बरीच ओढाताण करावी लागते, प्रोटोकॉलनुसार सन्मान राखला जात नाही, असा भाजपाच्या गोटातील सूर आहे. पाच आमदार असूनही मंत्रिपद मिळाले नसल्याने पक्ष वाढीच्या दृष्टीने फटका बसतो आहे. त्यातच पालकमंत्री पद सेनेकडे असल्याने आणि त्यातही महसूल खाते असल्याने प्रशासनावर सेनेचीच पकड आहे. त्यामुळे पाच आमदार असलेल्या भाजपाला दुय्यम वागणूक मिळत असल्याचा सूर आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत भाजपाने सत्तेत रहावे की नाही असा प्रश्न पुढे आल्यास या आमदारांकडून एखादवेळी ‘निगेटिव्ह’ रिमार्क मिळण्याची दाट शक्यता राजकीय गोटात वर्तविली जात आहे.