जिल्ह्यात बारा दिवसात पाच जणांचा खून, गुन्हेगारीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 01:05 PM2021-11-23T13:05:32+5:302021-11-23T13:13:47+5:30
नाेव्हेंबर महिन्यात १२ दिवसात पाच जणांचा खून झाला आहे. पाेलिसांनी आराेपी अटक केले असले तरी ही बाब सर्वांसाठी चिंतनाची आहे. वाढता रक्तपात हा सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे.
यवतमाळ : क्षुल्लक कारणावरून थेट जीवानीशी ठार करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. खुनाच्या घटनांनी जिल्हा हादरत आहे. नाेव्हेंबर महिन्यात १२ दिवसात पाच जणांचा खून झाला आहे. पाेलिसांनी आराेपी अटक केले असले तरी ही बाब सर्वांसाठी चिंतनाची आहे. वाढता रक्तपात हा सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे. वेळीच यात सुधारणा झाली नाही तर ताे आणखी गंभीर रूप धारण करण्याची दाट शक्यता आहे.
नाेव्हेंबर महिन्यातील खुनाचे सत्र हे १० तारखेपासून सुरू झाले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थांचा काेणतेही कारण नसताना चाकूने भाेसकून खून झाला. यातील आराेपी अटक हाेत नाही ताेच शहरातील आर्णी मार्गावर एकाने वकिलावर प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने यात वकील हर्षवर्धन देशमुख हे बचावले. यातील आराेपी अजूनही पाेलिसांच्या हाती लागला नाही. त्याचा शाेध सुरूच असून आराेपी अटकपूर्व जामिनासाठी धडपड करत आहे.
या दाेन्ही घटनेनंतर दिग्रस शहरालगत सावंगी बु. येथे पूजा अनिल कावळे या महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पूजाची ओळख पटवून पाेलिसांनी तिच्या पतीसह चार जणांना अटक केली. त्याचपाठाेपाठ कळंब तालुक्यातील तिरझडा येथील विवाहित तरुणाचे घरून अपहरण करण्यात आले. त्याचा दाेन दिवसांनी वडकी शिवारात वर्धा नदीपात्रात मृतदेह आढळला. कळंब, वडकी आणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चारही बाजूने तपास करत आराेपींना हुडकून काढले. यात आठ जणांना अटक करण्यात आली. मुलीला छेडत असल्यावरून हा खून झाला.
घंटीबाबा यात्रेतही झाली होती हाणामारी
दिग्रस शहरात ऑक्टाेबर महिन्यात घंटीबाबा यात्रेत दाेन गटात हाणामारी झाली. यात पाेलीस दफ्तरी अनेक गुन्हे शिरावर असलेला शिनू गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नागपूर येथे उपचार करण्यात आले. रुग्णालयातून घरी आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी १८ नाेव्हेंबर राेजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणीसुध्दा दिग्रस पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आराेपींना पाेलिसांनी पूर्वीच अटक केली हाेती.
पुसद शहरात जुन्या वादातून युवकाची हत्या करण्यात आली. चार महिन्यांपूर्वीच मारेकऱ्यांनी मृतकाला धमकी दिली हाेती. ही घटना रविवारी रात्रीच्या दरम्यान घडली. पाेलिसांनी यातील आराेपींना अटक केली आहे.
या सर्व घटनांमुळे नाेव्हेंबर महिना गाजत आहे. जिल्ह्यात सुरू असलेले खुनाचे सत्र थांबणार कधी व कसे याचे उत्तर मात्र काेणाकडेच नाही.