यवतमाळ जिल्ह्यातील बानगाव येथे धर्मातरांचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 12:40 PM2021-01-23T12:40:15+5:302021-01-23T12:40:36+5:30
Yawatmal news शुक्रवारी सांयकाळी सहा वाजता भाजप तालुका अध्यक्षाच्या सतर्कतेने बानगाव येथे धर्मांतराचा प्रयत्न करताना अमरावतीच्या ५ जणांना अटक केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नेर तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करून आर्थिक मदत करणारी टोळी सक्रीय आहे. शुक्रवारी सांयकाळी सहा वाजता भाजप तालुका अध्यक्षाच्या सतर्कतेने बानगाव येथे धर्मांतराचा प्रयत्न करताना अमरावतीच्या ५ जणांना अटक केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती येथील संजय सुरेश दिवे (वय ४९), अस्मिता संजय दिवे (वय ५२), भूषण संतोष अंबोरे (वय २२), रामेश्वर रमेश दिवे (वय ३१), गौरव देवीदास आत्राम (वय ३१) हे नेर तालुक्यातील बानगाव येथील बाळू महादेव चव्हाण यांच्या घरी ख्रिश्चन धर्माचा प्रचार व मार्गदर्शन करत होते. याच गावातील भाजप तालुका अध्यक्ष अनिल राठोड यांना या बाबत माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकारी व लोकांसह घेराव घातला. यावेळी सदर आरोपीनी उडवाउडवीचे उत्तर दिले. राठोड यांनी नेरचे ठानेदार ज्ञानेश्वर घुगे यांना माहिती दिली. नेर पोलीसांनी घटनास्थळी येऊन दिवे दापत्यासह ५ जणांना अटक केली.
त्यांच्यावर भादवी २९५ अ, १५३ अ, १४३, १८८ नुसार गुन्हा काल रात्री उशिरा दाखल केला. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप गवई करीत आहे. सदर टोळीने आतापर्यंत नेर तालुक्यात अनेकांचे आर्थिक अमिष देऊन धर्मांतर केल्याचा संशय भाजपा तालुका अध्यक्ष अनिल राठोड यांनी व्यक्त केला आहे.