पाच ट्रक सागवान हैदराबादमध्ये पोहोचले

By admin | Published: October 18, 2015 02:42 AM2015-10-18T02:42:55+5:302015-10-18T02:42:55+5:30

एक-दोन नव्हे तर तब्बल पाच ट्रक अवैध सागवान गेल्या काही दिवसात यवतमाळवरून पांढरकवडा मार्गे हैदराबादमध्ये सुरक्षितरीत्या...

Five trucks reached Hyderabad in Hyderabad | पाच ट्रक सागवान हैदराबादमध्ये पोहोचले

पाच ट्रक सागवान हैदराबादमध्ये पोहोचले

Next

आरोपी चालकाची कबुली : चिचबर्डी जंगलात अवैध वृक्षतोड, यवतमाळ आरएफओ संशयाच्या भोवऱ्यात
नरेश मानकर पांढरकवडा
एक-दोन नव्हे तर तब्बल पाच ट्रक अवैध सागवान गेल्या काही दिवसात यवतमाळवरून पांढरकवडा मार्गे हैदराबादमध्ये सुरक्षितरीत्या पोहोचविले गेल्याची खळबळजनक कबुली अटकेतील आरोपी चालकाने दिली आहे. या कबुलीने वन प्रशासन चांगलेच हादरले.
गुरुवारी सायंकाळी पांढरकवडा येथील वन परिक्षेत्र अधिकारी बाबाराव पवार यांनी संशयावरून राष्ट्रीय महामार्गावर एक ट्रक पकडला. त्यातील सागवानावर लावण्यात आलेले हॅमर आणि खोडतोडीमुळे रहदारी पासवर संशय आल्याने त्यांनी हा ट्रक ताब्यात घेतला. त्यातून सुमारे सहा लाखांचे सागवान जप्त करण्यात आले. ट्रक चालक रिजवान खॉ रहीम खॉ व वाहकाला अटक करण्यात आली. त्या दोघांना १८ आॅक्टोबरपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात यवतमाळ येथील सागवान कंत्राटदार शेख चाँद याला आरोपी बनविण्यात आले असून त्याचा यवतमाळात शोध घेतला जात आहे. शेख चाँद फरार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासादरम्यान चालक रिजवान याने अनेक गंभीरबाबी उघड केल्या. सूत्रानुसार, रिजवानने वन अधिकाऱ्यांना सांगितले की, आरएफओ पवार यांनी पकडलेला हा सहावा ट्रक होता. यापूर्वी अशाच पद्धतीने बोगस हॅमर व बोगस रहदारी पासच्या सहाय्याने तब्बल पाच ट्रक सागवान हैदराबाद येथे पोहोचविण्यात आले आहे. सागवान पोहोचविण्याची ही नेहमीचीच पद्धत आहे. या ट्रकला आतापर्यंत यवतमाळपासून पिंपळखुटी चेक पोस्टपर्यंत फॉरेस्ट किंवा पोलीस विभागाच्या कोणत्याही यंत्रणेने थांबविलेले नाही. या कबुलीने वन खात्यात खळबळ निर्माण झाली.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, यवतमाळातील चिचबर्डी, लासीना, वाघापूर, पिंपरी, कीटा या जंगलात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात सागवान तोड झाली आहे. ही बहुतांश तोड आदिवासींच्या मालकीची जमीन, भोगवटदार -२ अर्थात महसूल जमीन आणि ई-वर्ग जमिनीवरील आहे. फार थोडी तोड ही वन जमिनीवरील असल्याचे सांगितले जाते. या वृक्षतोडी मागे शेख चाँद आणि कंपूच असावी, असा संशय आहे. याच जंगलातील पाच ट्रक माल आंध्रात पोहोचला. या मालावरील हॅमर बोगस आहेत. सागवानाच्या वाहतूक परवान्याची मुदत १५ दिवस असताना गेल्या सहा महिन्यांपासून एकाच रहदारी पासवर तब्बल सहा ट्रक सागवान नेले गेले. त्यातील पाच ट्रक सुखरुप पोहोचले. मात्र सहावा ट्रक पांढरकवड्याचे वन परिक्षेत्र अधिकारी बाबाराव पवार यांच्या सतर्कतेने पकडला गेला. वन विभागाने जप्त केलेला माल आणि चिचबर्डी-लासीना जंगलातील तोड झालेल्या सागवान थुटांची जुळवणी करण्याचा प्रयत्न वन खात्याकडून सुरू आहे. पाच ते सहा ट्रक सागवान वृक्षांची ही तोड यवतमाळचे वन परिक्षेत्र अधिकारी मडावी, वनपाल भोजने आणि वनरक्षक यादव यांच्या कार्यक्षेत्रातील असल्याचे आढळून आले आहे. सागवान तस्कर शेख चाँद आणि वन अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध सर्वश्रृत आहेत. त्यांच्या संगनमतातूनच ही भली मोठी वृक्षतोड झाली असून त्यातील सागवानही राजरोसपणे आंध्र प्रदेशात पोहोचविले गेले. या वृक्षतोडीने यवतमाळचे एसीएफ, आरएफओ, वनपाल, वनरक्षक अशा सर्वांच्याच प्रामाणिकतेवर आणि कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

Web Title: Five trucks reached Hyderabad in Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.