फिक्स पॉर्इंट, चार्ली पेट्रोलिंग निष्प्रभ

By admin | Published: June 22, 2017 12:57 AM2017-06-22T00:57:59+5:302017-06-22T00:57:59+5:30

यवतमाळ शहर व परिसरात पोलिसांची चार्ली पेट्रोलिंग, फिक्स पॉर्इंट सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी...

Fix Point, Charlie Petroling Flawed | फिक्स पॉर्इंट, चार्ली पेट्रोलिंग निष्प्रभ

फिक्स पॉर्इंट, चार्ली पेट्रोलिंग निष्प्रभ

Next

गुन्हेगारी वाढली : भरदिवसा घरफोड्या-मंगळसूत्र चोरी, आज क्राईम मिटींग
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ शहर व परिसरात पोलिसांची चार्ली पेट्रोलिंग, फिक्स पॉर्इंट सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मंगळसूत्र चोरी, भरदिवसा होणाऱ्या चोरी-घरफोडीच्या घटना पाहता ही पेट्रोलिंग निष्प्रभ ठरल्याचे दिसून येते.
यवतमाळ शहर आणि वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा चोऱ्या-घरफोड्या होत आहे. मंगळवारी सायंकाळी दर्डानगर भागात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्याची घटना घडली. या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. घडलेले गुन्हे पाहिजे त्या गतीने उघडकीस येत नसल्याने रोष आहे.
पूर्वी शहरात महत्वाच्या चौकात पोलिसांचे फिक्स पॉर्इंट लावले जात होते. प्रत्येक मोठ्या चौकात किमान चार पोलीस २४ तास उपलब्ध राहत होते. त्यामुळे गुन्हेगारीला आपसुकच चाप बसत होता. पोलीस रस्त्यावर उपलब्ध असल्याने गुन्ह्याची वेळ टळत होती. या फिक्स पॉर्इंटला चार्ली पेट्रोलिंगचीही तेवढीच साथ लाभत होती. वायरलेस सेट घेऊन दुचाकीवर १५ ते २० कर्मचारी वेगवेगळ्या भागात सतत गस्त घालत असल्याने गुन्हेगारीला आळा बसत होता. परंतु अलिकडे ही पेट्रोलिंग व फिक्स पॉर्इंट तेवढ्या मोठ्या संख्येने दिसत नाही. कुठे असले तरी संख्या कमी असल्याने त्यांचा तेवढा प्रभाव जाणवत नाही. त्यामुळेच की काय रात्री ऐवजी आता दिवसा घरफोड्या होऊ लागल्या.
अनेक चौकात टवाळखोरांचे अड्डे
फिक्स पॉर्इंट नसल्याने चौकाचौकात टवाळखोरांची गर्दी पहायला मिळत आहे. त्या चौकात लागणाऱ्या विविध साहित्य-विक्रीच्या आणि विशेषत: खाद्य पदार्थांच्या गाड्या या टवाळखोरांचे अड्डे बनले आहेत. या गाड्यांच्या समोर भर रस्त्यावर अर्ध्यापर्यंत वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
महिला पोलिसांचे पथक हवे
टवाळखोरांची हीच फौज शाळा-महाविद्यालय, कोचिंग क्लासेसच्या बाहेर टेहळणी करताना पहायला मिळते. त्यातूनच चिडीमारी, महिला-मुलींची छेडखानी या सारखे प्रकार वाढले आहे. विद्यार्थिनी जीव मुठीत घेऊन जाताना दिसत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले स्वतंत्र पथक पोलीस अधीक्षकांनी गठित करावे, अशी मागणी महिला वर्गातून पुढे येत आहे.

पोलीस महानिरीक्षक आज जिल्ह्यात

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे गुरुवारपासून दोन दिवस यवतमाळ जिल्ह्यात तळ ठोकणार आहेत. गुरुवारी ठाणेदारांची क्राईम मिटींग आणि पोलीस दरबार घेतला जाणार आहे. ते पांढरकवडा आणि वणी पोलीस ठाण्यालाही भेट देणार असल्याची माहिती आहे. आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानिरीक्षक वाकडे हे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहे.

 

Web Title: Fix Point, Charlie Petroling Flawed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.