स्वातंत्र्यानंतर प्रथमच ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:12 PM2018-08-22T22:12:08+5:302018-08-22T22:12:24+5:30
तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीवर स्वातंत्र्यानंतर प्रथमच स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकला. ध्वजारोहणाचा प्रथम मान सरपंच सुनिता मनोहर पवार यांना मिळाला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेल्या सर्व लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांनी यामुळे आनंद साजरा केला.
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीवर स्वातंत्र्यानंतर प्रथमच स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकला. ध्वजारोहणाचा प्रथम मान सरपंच सुनिता मनोहर पवार यांना मिळाला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेल्या सर्व लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांनी यामुळे आनंद साजरा केला.
सन १९६२ मध्ये गोरेगाव ग्रामपंचायतीची स्थापना झाली. मात्र स्वतंत्र वास्तू नसल्यामुळे सर्व कारभार गावातील शाळेच्या इमारतीतून सुरू होता. त्यामुळे आत्तापर्यंत ग्रामपंचायतीत स्वतंत्र असा कोणताही कार्यक्रम साजरा झाला नाही. १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी देशातील सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था आदींसह विविध कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकविला जातो. एवढेच नव्हे, तर भारतीय स्वातंत्र्याचा हा उत्सव देशातील सर्व नागरिकांना साजरा करता यावा म्हणून सर्वांनाच राष्ट्रध्वज फडकविण्याचा अधिकार देण्यात आला. शासकीय कार्यालयांमध्ये तर ध्वजारोहणाचा मान मिळणे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. याकरिता अनेकदा वादही उत्पन्न होतात. मात्र तालुक्यातील १९६२ मध्ये स्थापन झालेल्या गोरेगाव ग्रामपंचायतीवर आजपर्यंत कधीच राष्ट्रध्वज न फडकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गोरेगाव येथे आत्तापर्यंत ग्रामपंचायतीला स्वतंत्र इमारत नव्हती. त्यामुळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून ग्रामपंचायतीचा कारभार हाकला जात होता. तेथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये ध्वजारोहणाचा मान मुख्याध्यापक किंवा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना मिळत होता. त्यामुळे गेली अनेक वर्षे गावातील अनेक सरपंच या सन्मानापासून वंचित राहिले. पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची स्वतंत्र वास्तू बांधण्यात आली. मात्र आत्तापर्यंत तेथे ध्वजारोहणाचा स्वतंत्र कार्यक्रम झालाच नाही. यावर्षी प्रथमच ग्रामपंचायतीतर्फे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. १५ आॅगस्टला सरपंच सुनिता मनोहर पवार यांनी प्रथमच ध्वजारोहण केले. याप्रसंगी उपसरपंच मिराबाई खराटे, ग्रामपंचायत सदस्य किशोर महिंद्रे, सुनील माळवे, शारदाबाई डाखोरे, सीमाताई ठाकरे, उमेश उगम, पोलीस पाटील प्रदीप मुंढे, मुख्याध्यापक कुलानंद गायकवाड, शिक्षक शैलेश चिरडे, शीतल डोळस आदी उपस्थित होते. गावकऱ्यांनी अत्यंत उत्साहाने स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा केला.
आत्तापर्यंत ध्वजारोहण का झाले नाही?
स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत गोरेगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकला नाही. परिणामी आत्तापर्यंतच्या सर्वच सरपंचांना राष्ट्रध्वज फडकविण्याचा सन्मान मिळाला नाही. त्यांना या सन्मानापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पंचायत समितीशी संपर्क केला. मात्र पंचायत समिती स्तरावरून कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही. तेथील ग्रामसेवक पी.एस.मानकर यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.