जिल्हा सहकारी बॅंकेवर महाविकास आघाडीचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 05:00 AM2020-12-23T05:00:00+5:302020-12-23T05:00:02+5:30
जिल्हा बॅंक संचालकाच्या २१ जागा आहेत. त्यापैकी तालुका गटाच्या पुसद व उमरखेड येथील जागा बिनविरोध झाल्या. तेथे अनुक्रमे अनुकूल विजय चव्हाण आणि प्रकाश पाटील देवसरकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित १९ जागांसाठी सोमवार २१ डिसेंबर रोजी २९ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. त्याची मतमोजणी दारव्हा रोड स्थित गुरुदेव मंगल कार्यालयात मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली. अवघ्या तासभरात तालुका गटाचे निकाल येणे सुरू झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या तब्बल १३ वर्षांनी झालेल्या संचालक मंडळ निवडणुकीत शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीने वर्चस्व स्थापन केले आहे. २१ पैकी सर्वाधिक १६ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. भाजप समर्थित शेतकरी सहकार विकास आघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. तर अपक्षांनी तीन जागांवर विजय मिळविला. महाविकास आघाडीची सत्ता आली असली तरी नेर व दिग्रस येथील उमेदवारांचा झालेला पराभव पालकमंत्री संजय राठाेड यांच्यासाठी धक्कातंत्र मानला जातो. भाजप समर्थित पॅनलमधीलही समन्वयकासह प्रमुख उमेदवार पराभूत झाले आहे.
जिल्हा बॅंक संचालकाच्या २१ जागा आहेत. त्यापैकी तालुका गटाच्या पुसद व उमरखेड येथील जागा बिनविरोध झाल्या. तेथे अनुक्रमे अनुकूल विजय चव्हाण आणि प्रकाश पाटील देवसरकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित १९ जागांसाठी सोमवार २१ डिसेंबर रोजी २९ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. त्याची मतमोजणी दारव्हा रोड स्थित गुरुदेव मंगल कार्यालयात मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली. अवघ्या तासभरात तालुका गटाचे निकाल येणे सुरू झाले. तालुका गटातच नव्हे तर जिल्हा गटातही काट्याची लढत पहायला मिळाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक १६ जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांमध्ये टिकाराम कोंगरे (वणी), संजय देरकर (मारेगाव), राजीव येल्टीवार (झरीजामणी), बाबूपाटील वानखडे (कळंब), मनीष पाटील (आर्णी), शिवाजी राठोड (महागाव), आशिष लोणकर (घाटंजी), वर्षा तेलंगे (राळेगाव), वसंत घुईखेडकर (जिल्हा गट- यवतमाळ), राजूदास जाधव (जिल्हा गट- यवतमाळ), संजय मोघे (जिल्हा गट- आर्णी), अनुकूल चव्हाण (पुसद), प्रकाश देवसरकर (उमरखेड), ॲड. शंकरराव राठोड (दारव्हा), शैलजा बोबडे (महिला गट- यवतमाळ), स्मिता कदम ( महिला गट- महागाव) यांचा समावेश आहे. भाजप समर्थित शेतकरी सहकार विकास आघाडीला केवळ दोन जागा मिळाल्या. त्यामध्ये अमन गावंडे (बाभूळगाव), राधेश्याम अग्रवाल (यवतमाळ) यांचा समावेश आहे. या निवडणुकीत तीन अपक्ष उमेदवारांनीही बाजी मारली. त्यात संजय देशमुख (दिग्रस), प्रकाश मानकर (पांढरकवडा), स्नेहल भाकरे (नेर) यांचा समावेश आहे.
जिल्हा बॅंकेच्या या निवडणुकीत शिवसेना व भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जिल्ह्यात भाजपचे सहा आमदार असताना भाजप समर्थित पॅनलला केवळ दोन जागा मिळविता आल्या. जिल्हा बॅंकेच्या या निवडणुकीत जिल्हा गटामध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली. राजूदास जाधव आणि नाना गाडबैले यांच्यात काट्याची लढत झाली. गाडबैले यांची पाच मतांची आघाडी घोषित झाल्यानंतर राजूदास जाधव यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यानंतर केवळ एका मताचा फरक राहिला. यावेळी प्रचंड ओढाताण, आकडेमोड व राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर राजूदास जाधव यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रमेश कटके यांनी विजयी घोषित केले.
जिल्हा बॅंकेच्या या निवडणुकीत मतदारांनी परंपरागत चेहऱ्यांना नाकारले. २१ पैकी तब्बल ११ नवीन चेहरे मतदारांनी बॅंकेत पाठविले. या नव्या चेहऱ्यांनी राजकीय दिग्गजांना चांगलीच धूळ चारली. तर दहा संचालक पुन्हा निवडून आले. माजी अध्यक्ष ॲड. विनायक एकरे, डॉ. रवींद्र देशमुख, नरेंद्र बोदकुरवार हे प्रमुख संचालक पराभूत झाले. तर मावळते अध्यक्ष अमन गावंडे, माजी अध्यक्ष मनीष पाटील हे बॅंकेत पुन्हा निवडून आले. या निवडणुकीत बॅंकेत माजी राज्यमंत्री, माजी आमदार पुन्हा निवडून आले आहेत.
काही तालुका गटात मतदारांना ‘हाय रेट’
या निवडणुकीत सर्व मतदारांच्या नजरा या झरी, नेर व कळंब तालुक्यात लागल्या होत्या. कारण तेथे आर्थिकदृष्ट्या भक्कम उमेदवार रिंगणात होते. तेथील दरही बरेच ‘हाय’ असल्याचे चर्चिले गेले. परंतु नेर व कळंब तालुक्यात मतदारांनी पैश्याऐवजी व्यक्तीला अधिक पसंती दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.
पराभूतांमार्फत ‘रिकव्हरी’ सुरू
बॅंकेच्या या निवडणुकीत सर्वत्रच पैसा मोठ्या प्रमाणात चालला. काही मतदारांनी दोन्हीकडून पैसा ओढला. त्यामुळे आता काही ठिकाणी ‘रिकव्हरी’ही सुरू होण्याची शक्यता आहे. पांढरकवडा येथे अशाच रिकव्हरीवरून सोमवारी विजयी उमेदवाराच्या घरापुढे पराभूताच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला. अखेर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. या घटनेची जिल्ह्यात कळंब, नेर व इतरही तालुक्यात पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक काळात उमेदवारांनी पार्ट्याही मोठ्या प्रमाणात दिल्या. मात्र कळंब तालुक्यात अखेरच्या चार दिवसात काही मतदार दोन्ही उमेदवारांच्या ‘भेटी’ घेतल्याने पर्दाफाश होण्याच्या भीतीने दोघांच्याही पार्ट्यांना गैरहजर राहिले.
ॲड. शंकरराव राठोड चौथ्यांदा विजयी
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत दारव्हा येथील ॲड. शंकरराव राठोड सलग चौथ्यांदा बॅंकेवर निवडून आले आहेत. सद्यस्थितीत ते सर्वात ज्येष्ठ संचालक आहे. कळंब तालुका गटातील चंद्रकांत उर्फ बाबूपाटील वानखडे तिसऱ्यांदा बॅंकेवर संचालक म्हणून निवडून आले आहे. अन्य काही संचालक दुसऱ्यांना निवडून आले.