गोळ्या झेलूनही ध्वजारोहणाचा मान नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 10:36 PM2019-08-17T22:36:52+5:302019-08-17T22:37:26+5:30
देशाच्या सीमांचे रक्षण करताना शत्रूच्या गोळ्या खायच्या आम्ही. बलिदानानंतर गावाकडे अंतिम संस्कार करताना चार बंदुकीच्या फैरी झाडल्या की झाला आमचा सन्मान. निवृत्तीनंतर साधा ध्वजारोहणाचा मानही आम्हाला मिळत नाही. हा प्रकार किती दिवस चालायचा, असा प्रश्न सेवानिवृत्त लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांनी उपस्थित केला आहे.
संजय भगत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : देशाच्या सीमांचे रक्षण करताना शत्रूच्या गोळ्या खायच्या आम्ही. बलिदानानंतर गावाकडे अंतिम संस्कार करताना चार बंदुकीच्या फैरी झाडल्या की झाला आमचा सन्मान. निवृत्तीनंतर साधा ध्वजारोहणाचा मानही आम्हाला मिळत नाही. हा प्रकार किती दिवस चालायचा, असा प्रश्न सेवानिवृत्त लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांनी उपस्थित केला आहे.
१५ आॅगस्टला सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्या पार्श्वभूमिवर त्यांनी ‘लौकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, देशाचा ध्वज उंच राहावा म्हणून सैनिक बलिदान करतात. मात्र जिवंतपणी आमच्या नशिबी नरक यातना येतात. आता सैनिकाच्या सन्मानात बदल झाला पाहिजे, अशी अपेक्षा घेऊन ते अन्य सैनिकांच्या अधिकारासाठी लढत आहे. सैनिकाच्या डोळ्यासमोर केवळ एकच विचार असतो, देशाचे संरक्षण करणे. मृत्यू केव्हा येईल हे सांगता येत नाही. डोळ्यात तेल घालून सीमेचे संरक्षण करताना आधी देश, नंतर कुटुंब हाच विचार मनात असतो. कित्येकदा कुटुंबातील सदस्यांचे छायाचित्र व त्यांची पत्रे खिशात घालूनच पहारा द्यावा लागतो, असे त्यांनी सांगितले.
लक्ष्मणराव कानडे रा.मुडाणा यांच्या बालपणीच आई-वडिलांचा मृत्यू झाला. १९६४ मध्ये लक्ष्मणराव कानडेसह ७0 युवक यवतमाळला सैन्य भरतीसाठी गेले. त्या सर्वांची निवड झाली. कानडे यांना मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव ट्रेनिंग सेंटर येथे पहिली नियुक्ती मिळाली. प्रशिक्षण पूर्ण झाले त्यावेळी बांगलादेशचे युद्ध संपले होते. युद्ध संपल्यामुळे जनतेत जाऊन मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले होते. यानंतर त्यांची नियुक्ती लेह-लडाख येथे झाली. तेथे केवळ बर्फ आणि बर्फातच त्यांनी दिवस-रात्र काढली. निवृत्तीनंतर गाव, खेड्यांमध्ये सैनिकाच्या हस्ते साधे ध्वजारोहण केले जात नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
तहसीलमध्ये सैनिकांची माहितीच नाही
माजी सैनिकांसाठी तालुका तेथे कार्यालयाकरिता जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी कानडे यांनी केली. १५ आॅगस्ट आला की आमची छाती भरून येते. मात्र दुर्दैव असे की निवृत्त सैनिकांची माहिती तहसीलमध्ये उपलब्ध नाही. ध्वजारोहणाचे साधे निमंत्रणही मिळत नाही. लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांनी निवृत्त सैनिकांच्या विविध समस्या शासन स्तरावर सोडवून घेण्याकरिता ‘जय जवान माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थे’ची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून माजी सैनिक रामदास वंजारे, संजय राठोड, दत्तराव टेकाळे, प्रयागबाई हिंगाडे, जगदेव हिंगमिरे, राजू कानडे, रंगराव आखरे, नंदाताई अंभोरे अहोरात्र काम करीत आहेत.