तिवस्याच्या चिमुकल्यांची विमानवारी

By admin | Published: July 30, 2016 12:48 AM2016-07-30T00:48:12+5:302016-07-30T00:48:12+5:30

तिवसा येथील जिल्हा परिषद शाळेच्या सात विद्यार्थ्यांनी थेट मुंबई गाठून चक्क मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Flight of Tiwu's fleet | तिवस्याच्या चिमुकल्यांची विमानवारी

तिवस्याच्या चिमुकल्यांची विमानवारी

Next

मुख्यमंत्र्याना भेटले : विधानभवनाची पाहणी
यवतमाळ : तिवसा येथील जिल्हा परिषद शाळेच्या सात विद्यार्थ्यांनी थेट मुंबई गाठून चक्क मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नागपूर येथून प्रथमच विमानात बसून त्यांनी मुंबई गाठली अन् तेथील झगमगाट बघून चिमुकले हरखून गेले.
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी डिजीटल शाळा, तंबाखूमुक्तीचा ध्यास शिक्षकांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांच्यात अभ्यासाची ओढ निर्माण व्हावी म्हणून तालुक्यातील तिवसा येथील जिल्हा परिषद शाळेने पुढाकार घेतला. २६ जून २०१५ रोजी तिवसा केंद्राचे केंद्रप्रमुख मधुकर काठोळे यांनी पहिली ते सातव्या वर्गात सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानवारी घडविण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन हजेरीवर व अभ्यासावर लगेच परिणाम झाला. तिवसा शाळेत बतवर्षी १५३ विद्यार्थी शिकत होते. विमानवारीच्या घोषणेमुळे पटसंख्या यावर्षी ३०० च्यावर पोहोचली. काठोळे यांनी घोषणा केल्याप्रमाणे २०१६ च्या वार्षिक परीक्षेत सर्वाधिक गुण घेणारे प्रत्येक वर्गातील प्रत्येकी एक असे, सात विद्यार्थी विमानवारीसाठी निवडले. शिक्षण विभागाकडून प्रक्रिया पूर्ण होताच बुधवार, २७ जुलैला सात विद्यार्थी, प्रत्येक वर्गाचा शिक्षक, शाळा समिती अध्यक्ष, सदस्य आणि पालक प्रतिनिधींना घेऊन मधुकर काठोळे नागपूर विमानतळावरून थेट मुंबईला पोहोचले. प्रवासाचा संपूर्ण खर्च मधुकर काठोळे यांनी उचलला.
मुंबईत या सर्वांची भेट बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी घालून दिली. खुद्द मुख्यमंत्री समोर असल्याने चिमुकले हरखून गेले. खेड्यातील हे चिमुकले स्वप्ननगरी मुंबईच्या भेटीने भारावून गेले होते. तत्पूर्वी गुरूवारी त्यांनी विधानसभेच्या कामकाजाची पाहणी केली. पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, आमीर खान, नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांच्याशीही संवाद साधला. या चिमुकल्यांमध्ये वैभवी नितीन चव्हाण, परी चेतन चव्हाण, रोशनी सुवर्णसिंग जाधव, सागर हुसेन मेश्राम, भूमिका राजेश राठोड, देवेंद्र रमेश चव्हाण, राधा विजय जाधव यांच्यासह शाळा समितीचे अध्यक्ष उत्तम मळघणे, गणेश जाधव, जयकांत जाधव, मुख्याध्यापिका माया राऊत यांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Flight of Tiwu's fleet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.