दराटीच्या शिवाजीनगर तांड्याला पुराचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 05:00 AM2021-08-20T05:00:00+5:302021-08-20T05:00:11+5:30
जंगलातील पूर्ण पाणी दराटी गावालगत असलेल्या तलावात येते. आता तलाव पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून तलावातील आऊटलेटमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत होते. ते पाणी नाल्यात आल्याने पूर वाढत गेला. गुरुवारी पहाटे ५ वाजेपासून पुराचे पाणी शिवाजीनगर तांडा क्रमांक दोन मधील १५० कुटुंबांची वस्ती असलेल्या घरात शिरणे सुरु झाले. नागरिक झोपेत असतानाच पुराचे पाणी घरात शिरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : दराटी गावालगत असलेला तलाव मुसळधार पावसामुळे पूर्णपणे भरला. तलावाच्या आऊटलेटमधून येणाऱ्या पाण्यामुळे बुधवारी शिवाजीनगर तांड्याला पुराचा वेढा पडला. तेथील १०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
महिला, पुरुष, मुलांना गावातील नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी हलविले. संसारोपयोगी साहित्यासह वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
तालुक्यात पैनगंगा अभयारण्य असल्यामुळे जंगलाचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. या जंगलातील पूर्ण पाणी दराटी गावालगत असलेल्या तलावात येते. आता तलाव पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून तलावातील आऊटलेटमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत होते. ते पाणी नाल्यात आल्याने पूर वाढत गेला.
गुरुवारी पहाटे ५ वाजेपासून पुराचे पाणी शिवाजीनगर तांडा क्रमांक दोन मधील १५० कुटुंबांची वस्ती असलेल्या घरात शिरणे सुरु झाले. नागरिक झोपेत असतानाच पुराचे पाणी घरात शिरले.
दराटी येथील शिवाजीनगर तांडा क्रमांक २ मधील सर्व कुटुंब सुरक्षित स्थळी हलविले. त्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था गावातील तलाठी, स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील करीत आहे. पुराच्या पाण्यामुळे जीवित हानी झाली नाही. परंतु पाणी घरात गेल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले. तलाठ्यामार्फत पंचनामे करणे सुरू आहे.
- आनंद देऊळगावकर,
तहसीलदार, उमरखेड