वणीसह कळंब तालुक्यात पूरस्थिती; जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली शाळांना सुटी
By विशाल सोनटक्के | Published: July 27, 2023 01:06 PM2023-07-27T13:06:55+5:302023-07-27T13:07:07+5:30
यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर, चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, कळंबमधील कात्री गावाला पुराने वेढले
यवतमाळ: बुधवारी रात्रीपासून यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. कळंबसह वणी, केळापूर आणि राळेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली असून गुरुवारी सकाळीही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील पूरस्थिती पाहता जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी गुरुवारी शाळांना सुटी जाहीर केली.
कळंब तालुक्यातील कात्री गावामध्ये पाणी शिरले आहे. तर वणी तालुक्यातील शेलू खुर्द गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हलपर नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वणीतील वर्धा नदीलाही पूर आला आहे. यामुळे तालुक्यातील नवीन सावंगी, चिंचोली, कवडसी हे मार्गदेखील बंद झाले आहे. मुसळधार पावसामुळे १६ घरांचे नुकसान झाले आहे. महागाव तालुक्यातील धनोडा येथेही पैनगंगेला पूर आला आहे.
दरम्यान, सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३९.४ मिमी पाऊस झाला आहे. कळंब तालुक्यात ११३, वणी ७८.८, केळापूर ७२.४ तर राळेगाव तालुक्यात ८६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळमध्ये ३५.६, बाभूळगाव २८.३, आर्णी २५.५, घाटंजी ३६, झरी ३७ तर मारेगाव तालुक्यात ५५ मिमी पाऊस कोसळला आहे. बुधवारी रात्रभर पाऊस झाला. त्यातच गुरुवारी सकाळी पावसाने अनेक भागाला झोडपल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.