सुकळीत दोन घरांना आग, चार लाखांचे नुकसान
By admin | Published: March 27, 2016 02:21 AM2016-03-27T02:21:03+5:302016-03-27T02:21:03+5:30
तालुक्यातील सुकळी (जा) येथील दोन घरांना शॉर्टसर्किटमुळे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.
लग्नाचे साहित्य खाक : दोन भावांचे संसार उघड्यावर
उमरखेड : तालुक्यातील सुकळी (जा) येथील दोन घरांना शॉर्टसर्किटमुळे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये जीवनावश्यक वस्तू, रोख रक्कम, सोने आदी साहित्य जळून सुमारे चार लाखांचे नुकसान झाले.
सविस्तर वृत्त असे की, अल्ताफ खॉ वजीर खॉ पठाण हे भावाच्या साखरपुड्यासाठी हिंगोली येथे सर्व परिवारासह गेले होते. यामुळे घरी कोणीच नव्हते. त्यांच्या घराला कुलूप होते. सायंकाळी ६ च्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे अचानक घराला आग लागली. पाहता पाहता काही मिनिटाच आगीने उग्ररुप धारण केले. शेजारी व गावातील नागरिक यांनी आग विझविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु आग वाढत गेली व चार लाखांचे नुकसान झाले. तहसीलदार भगवान कांबळे, ठाणेदार शिवाजी बचाटे यांना घटनेची माहिती देण्यात आल्यावर उपनिरीक्षक लक्ष्मीबाई मलकुलवार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याच बरोबर उमरखेड नगर परिषदेचे अग्नीशमन दलही रवाना झाले. मात्र तोपर्यंत आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्य जळून खाक झाले.
या आगीने शेजारीच असलेले अल्ताफ खॉ वजीर खॉ पठाण यांचे भाऊ इद्रीस खॉ पठाण यांच्या घरालाही घेरले. त्यावेळी अग्नीशमन दलाचे जवान, पोलीस प्रशासन व गावातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु दोनही घरात गॅस सिलिंडर होते.
पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून ते सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शेवटी रात्री उशिरा आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले. घटना घडली त्यावेळी दोनही घरातील मंडळ हजर नव्हती. आगीत ३५ हजार रुपये रोख, सोने-चांदी, फ्रीज, कुलर यासह घरातील महागड्या वस्तू जळून गेल्या.
अल्ताफ पठाण यांच्या मुलीचा विवाह यावर्षी करावयाचा होता म्हणून लग्नाची पूर्ण तयारी करण्यात आली होती. मुलीला लग्नात भेट देण्यापासून तर लग्नाच्या सर्व वस्तू, कापड व इतर साहित्य घरात गोळा करून ठेवण्यात आले होते. ते आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून चार लाखांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)