प्राधिकरणापासून हाकेच्या अंतरावर नळाच्या पाण्याची वाहतेय गंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 06:00 AM2020-01-26T06:00:00+5:302020-01-26T06:00:20+5:30
नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी प्राधिकरणाने खोदकाम केले. यंत्राच्या सहाय्याने काम करताना घरगुती पाईपलाईन उखडल्या गेल्या. त्या जोडण्याचे सौजन्यही या विभागाने दाखविले नाही. तुटलेल्या पाईपला प्लास्टिकचे पाईप जोडून घरापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न नागरिकांकडून झाला. मात्र मुख्य पाईपही फुटले असल्याने त्यांचा हा प्रयोगही अयशस्वी ठरत आहे. या भागातील नागरिकांकडे पिण्याच्या पाण्यासाठी प्राधिकरणाचे पाणी हाच एकमेव स्रोत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्लक्षितपणाची मालिकाच जणू या विभागाने सुरू केली आहे. विविध तांत्रिक कारणे पुढे करून पाणीपुरवठ्यात अनियमितता आणली गेली आहे. आता प्राधिकरणानेच केलेल्या कामामुळे नागरिकांना नळाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. बाजोरियानगर, विदर्भ हाऊसिंग सोसायटीतील शेकडो नागरिक या प्रश्नाचे बळी पडले आहेत.
नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी प्राधिकरणाने खोदकाम केले. यंत्राच्या सहाय्याने काम करताना घरगुती पाईपलाईन उखडल्या गेल्या. त्या जोडण्याचे सौजन्यही या विभागाने दाखविले नाही. तुटलेल्या पाईपला प्लास्टिकचे पाईप जोडून घरापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न नागरिकांकडून झाला. मात्र मुख्य पाईपही फुटले असल्याने त्यांचा हा प्रयोगही अयशस्वी ठरत आहे. या भागातील नागरिकांकडे पिण्याच्या पाण्यासाठी प्राधिकरणाचे पाणी हाच एकमेव स्रोत आहे. नळालाच पाणी नसल्याने त्यांना भटकंती करावी लागत आहे. हातपंप, विहीर आदी स्रोत घराच्या आसपास नाही. पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी प्राधिकरणावर आपला रोष व्यक्त केला. मात्र या विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांची ही समस्या गांभीर्याने घेतली नाही.
खोदकाम करत असताना घरगुती पाईपलाईन फुटू नये यासाठी कुठलीही दक्षता घेतली जात नाही. शहराच्या अनेक भागातील नागरिकांना या प्रश्नाला सामोरे जावे लागले आहे. विकास कामे करताना नागरिकांची साथ मिळत असली तरी त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी संबंधित विभाग उदासीन असल्याचे दिसून येते. शहरात भूमिगत गटार योजनेच्या कामातही असाच प्रकार सुरू आहे. संबंधित अभियंत्यांना सूचना केल्यानंतरही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या संतापाचा बांध फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अभियंत्यांची टोलवाटोलवी
यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वेगवेगळ्या परिसरासाठी अभियंत्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चापडोह प्रकल्पावरून घेतलेले पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेले अभियंता तर चक्क वॉलमनचे नाव सांगून मोकळे होतात. कुठलीही तक्रार ते गांभीर्याने घेत नाहीत.